मुलींच्या सक्षमीकरणासाठी बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान राज्यभर व्यापक स्वरूपात राबवावे

Photo of author

By Sandhya

  • महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

राज्यात मुलींच्या जन्माचे स्वागत, शिक्षणात त्यांचा सहभाग वाढविणे आणि बालविवाह रोखण्यासाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियान राबविण्यात येत असून, मागील सहा महिन्यांत १,४६,४५९ नागरिकांच्या सहभागासह ८७३ विविध उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक नागरिकांपर्यंत योजना पोहोचविण्याचे निर्देश त्यांनी दिले.
बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान, कुटुंब सल्ला केंद्र अंतर्गत प्रलंबित प्रकरणे, शासकीय संस्थांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, अहिल्याभवन, चेंबूर संदर्भात आढावा, दि चिल्ड्रेन एड सोसायटी संदर्भात प्रलंबित प्रकरणे, राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे सदस्य निवडीसंदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त नयना गुंडे, सहसचिव वि.रा.ठाकूर, सहआयुक्त राहूल मोरे आदिसह अधिकारी उपस्थित होते.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, मुलीच्या जन्माचे स्वागत, मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे यासाठी राज्यात बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. तसेच, हजारामागे असलेला मुलींचा जन्मदर याप्रमाणे जिल्ह्यांची वर्गवारीही करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत आरोग्य शिबिरे आयोजित करणे, मुलीच्या जन्माचे स्वागत करणे, पथनाट्ये असे विविध उपक्रम राबविण्यात येतात. बालविवाह निदर्शनात येत असलेल्या अशा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हे अभियान राबविण्यात यावे, असे निर्देशही तटकरे यांनी दिले.
विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी पदभरती करण्यात यावी. विभागाच्या विविध योजना ज्या विविध संस्थांमार्फत राबविण्यात येतात अशा संस्थांना नियमानुसार निधी उपलब्ध करून द्यावा. चेंबूर येथे अहिल्याभवन उभारण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी. राज्य बालहक्क संरक्षण आयोग सदस्य निवडीसंदर्भात तातडीने कार्यवाही करावी. कार्यरत असलेले ४४ कुटुंब सल्ला केंद्र हे वन स्टॉप सेंटरमध्ये विलीन करावेत, केंद्रातील केस वर्कर आणि समुपदेशक यांना वन स्टॉप सेंटरमध्येच समुपदेशक पदावर नियुक्ती देण्यात यावी. समुपदेशकांचा प्रलंबित निधी तत्काळ देण्यात येईल असेही तटकरे यांनी सांगितले.

Leave a Comment

You cannot copy content of this page