मेट्रोचे सर्व टप्पे २०२६ च्या अखेरपर्यंतप्रवाशांकरिता खुले होणार

Photo of author

By Sandhya

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
    ठाण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी
    मेट्रो प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
    मेट्रो मार्ग-४ व ४ अ, टप्पा-१, गायमुख ते विजय गार्डन स्टेशन पर्यंत मेट्रोची तांत्रिक तपासणी व चाचणी संपन्न

मेट्रो ४ आणि ४ अ या मार्गिका वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला जोडणाऱ्या मेट्रो ११ या मार्गिकेला जोडण्यात येणार असल्याने ५८ कि.मी. लांबीची देशातील सर्वात मोठी मेट्रो मार्गिका ठाणे आणि मुंबईसाठी महत्त्वाची ठरेल. २०२६च्या ऑक्टोबरपर्यंत या मेट्रोचे सर्व टप्पे प्रवाशांकरिता खुले होतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मेट्रो मार्ग ४ (वडाळा–कासारवडवली) व ४ अ (कासारवडवली–गायमुख) च्या टप्पा-१ गायमुख जंक्शन गायमुख गाव- घोडबंदर रोड- कासारवडवली- विजय गार्डन या मार्गिकेच्या प्राधान्य विभागावर तांत्रिक तपासणी व ट्रायल रनची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री तथा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अध्यक्ष एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना, कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मेट्रो मार्ग ४ आणि ४ अ बद्दल माहिती देताना म्हणाले की, घाटकोपर-मुलुंड -गायमुख या मेट्रो मार्गिकेची एकूण लांबी ३५ किलोमीटर असून मेट्रो ४ ची ३२ कि.मी. आणि मेट्रो ४ अ ची २.८८ कि.मी. आहे. मार्गिकेत एकूण ३२ स्थानके असून या प्रकल्पासाठी १६ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मेट्रो ४, मेट्रो ४ अ, मेट्रो १० आणि मेट्रो ११ या सर्व मेट्रोसाठी डेपो तयार करण्याकरिता भोगरपाडा येथे ४५ हेक्टर जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या मेट्रो मार्गिकेचा विशेष फायदा असा आहे की, पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरे, मुंबई शहर आणि ठाणे शहर या सर्व मार्गांना जोडणारा हा मार्ग असणार आहे. पुढे ही मार्गिका वडाळा ते छत्रपती शिवाजी टर्मिनसला जोडणाऱ्या मेट्रो ११ ला जोडली जाणार आहे. त्यामुळे ही ५८ किमी लांबीची देशातील सगळ्यात मोठी मेट्रो मार्गिका निर्माण होणार आहे. या मेट्रोच्या सर्व मार्गिका सुरु झाल्यावर यामध्ये १३ लाखापेक्षा जास्त दैनंदिन प्रवासी प्रवास करतील. या मेट्रोमुळे रस्त्यावरची वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी होईल. पुढच्या वर्षाच्या शेवटापर्यंत या मेट्रोचे टप्प्याटप्प्याने सर्व टप्‍पे प्रवाशांकरिता खुले झाले पाहिजेत असा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment

You cannot copy content of this page