



शिक्षण हेच ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना साध्य होण्याचे साधन – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
पुणे, दि. ३०: संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे अर्थात ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना केवळ शिक्षणातून साध्य होऊ शकते. पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एक सुहृदयी उपक्रम म्हणून सुरू केलेली ही मोहीम आज एक चैतन्यशील, बहु-विद्याशाखीय शैक्षणिक परिसंस्थेत रूपांतरित झाली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
सिम्बायोसिस विश्वभवन येथे सिम्बायोसिस आंतराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक आणि कुलपती पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त सकाळ मीडिया प्रायव्हेट लिमिटेडने आयोजित केलेल्या डॉ. एस. बी. मुजुमदार यांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, श्रीमती संजीवनी मुजुमदार, सकाळ मीडिया प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, सकाळचे संपादक सम्राट फडणीस, राज्यपाल यांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. मुजुमदार यांना ९० व्या वाढदिवसानिमित्त अभिनंदन करुन शतायुषी व्हावे अशा शुभेच्छा देत राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले, सिम्बायोसिस ही संस्था भारत आणि परदेशातील हजारो तरुण मनांना सक्षम बनवत आहे. शिक्षण हे केवळ मनाला प्रकाशित करण्याचे साधन नाही तर शिक्षणाने सहानुभूती, एकता आणि शांती देखील मनामध्ये रुजवली पाहिजे हा डॉ. मुजुमदार यांचा दृढ विश्वास आहे.
पद्मभूषण डॉ. मुजुमदार यांच्या सत्काराचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल सकाळ मीडिया समुहाचे अभिनंदन करून राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले, ‘सकाळ’ वृत्तपत्राची स्थापना ९३ वर्षांपूर्वी स्वर्गीय नानासाहेब परुळेकर यांनी केली होती. प्रतापराव पवार आणि आता अभिजीत पवार यांनी दूरदृष्टी आणि समर्पणाने वृत्तपत्राचा समृद्ध वारसा पुढे नेला आहे. संस्था नफ्यासाठी नव्हे तर उद्देशाने बांधल्या जातात तेव्हा दृष्टी वचनबद्धतेशी जुळते तेव्हा काय होते याची सिम्बायोसिस आणि सकाळ दोन्ही आदर्श उदाहरणे आहेत, असेही ते म्हणाले.
गेल्या पाच दशकांमध्ये, सिम्बायोसिसने एक मोठी प्रतिष्ठा मिळविली केली आहे. डॉ. मुजुमदार आणि श्रीमती संजीवनी मुजुमदार यांनी शिक्षणासाठी घरापासून दूर असलेल्या जगातील 85 हून अधिक देशांमधील विद्यार्थ्यांसाठी आपल्या विद्यापीठाच्या रुपाने एक घर निर्माण केले आहे. त्यांनी महाराष्ट्राला आणि विशेषतः पुणे शहराला देशातील उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणून ओळख मिळवून दिली आहे.
शिक्षण हे आपले चरित्र निर्माण करते, त्याला चांगला आकार देते. मनुष्याला यशस्वी होण्यासाठी स्वयंशिस्त आवश्यक आहे. तुम्ही तुमच्यातील प्रतिभेचा शोध घेतला पाहिजे. तुमची प्रतिभा तुमच्यासाठी आणि समाजासाठी, जगासाठी उपयुक्त असली पाहिजे आणि त्याप्रमाणे तिचा वापर केला पाहिजे. संपूर्ण जग आज खुले असून अनेक लक्ष विचलित करणाऱ्या बाबी आहेत. परंतु, त्यातून काय निवडायचे आणि पुढे जायचे हे आपल्यावर अवलंबून आहे, असेही ते म्हणाले.
प्रत्येकाला आपल्या भाषेचा अभिमान असला पाहिजे. मात्र, इतरांच्या भाषेचाही द्वेष होऊ नये. प्रत्येक विद्यापीठात इंग्रजीव्यतिरिक्त इतर कोणत्याही एका विदेशी भाषेचे शिक्षण दिले जावे यासाठी सर्व विद्यापीठांचा कुलपती म्हणून आपली भूमिका असल्याचेही ते म्हणाले.
खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती म्हणाले, डॉ. मुजुमदार यांनी केवळ भारतातील आणि विदेशातील विद्यार्थ्यांनाच शिकवले नाही तर देशातील बहुजन समाजाला शिक्षित करण्यासाठी प्रयत्न केले. शिक्षण हे प्रत्येक प्रकारच्या विकासाचा पाया आहे ही राजर्षी शाहू महाराज यांची भूमिका होती. त्यांच्या विचारांनुसार डॉ. मुजुमदार यांनी काम केले.
डॉ. मुजुमदार यांचा ९० वा वाढदिवस हा जागतिक विद्यार्थ्यांचा सन्मान आहे. सिम्बायोसिस विद्यापीठ हे विचारांचे विद्यालय आहे. युरोपातील प्रगत देशात शिक्षणासाठी जाणे परवडत नाही अशा परदेशी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या रुपाने मदत करुन ते एक प्रकारे जगाची मदत करत आहेत, असेही श्रीमंत शाहू महाराज छत्रपती म्हणाले.
सन्मानाला उत्तर देताना डॉ. मुजुमदार म्हणाले, एका परदेशी विद्यार्थ्याचे दु:ख पाहून आपल्याला आयुष्याचे प्रयोजन समजले. त्यातून आणि परदेशी विद्यार्थी तसेच भारतीय विद्यार्थी यांच्यात मैत्री व्हावी, सलोखा निर्माण व्हावा आणि त्याद्वारे जागतिक शांततेचा मार्ग तयार व्हावा या उद्देशाने या विद्यापीठाची स्थापना केली. आज जगात मोठ्या प्रमाणात अशांतता आहे. युद्धाशिवायचे जग हवे असेल तर ‘वसुधैव कुटुंबकम्’ या संकल्पनेला पर्याय नाही. ही संकल्पना भारतीय आहे याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे.
शिक्षण म्हणजे केवळ परीक्षा, त्यातील गुण, पदवी इतकेच नाही तर जबाबदार नागरिक घडविण्याचे साधन आहे. शिक्षणाच्या माध्यमातून आपण जागतिक नागरिक झालो पाहिजे. असे झाल्यास कोणीही विदेशी नागरिक राहणार नाही, असेही ते म्हणाले.
अभिजित पवार म्हणाले, विद्यार्थ्याला झालेला त्रास पाहून ‘वसुधैव कुटुंबकम्’ या संकल्पनेनुसार डॉ. मुजुमदार यांनी या विद्यापीठाची स्थापना केली. जगातील 2 लाख विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. भौतिक, अध्यात्मिक, संतुलित जीवन कसे जगायचे हे डॉ. मुजुमदार यांच्याकडून शिकले पाहिजे. ज्ञानी ते ज्ञानयोगी असा त्यांचा प्रवास आहे. ज्ञानाची विद्यापीठे ही ज्ञानाची मंदिरे झाली पाहिजेत, असेही श्री. पवार म्हणाले.
यावेळी श्री. फडणीस यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी डॉ. मुजुमदार यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळमार्फत तयार करण्यात आलेल्या ‘ज्ञानपर्व’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी सिम्बायोसिस विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्र-कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार, सकाळ मीडिया ग्रुपचे संपादक अनिकेत काणे, विद्यापीठातील विविध विद्याशाखांचे प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
0000