राज्याच्या आर्थिक प्रगतीत उद्योग क्षेत्राचा वाटा मोठा

Photo of author

By Sandhya


– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· एक लाख आठ हजार पाचशे कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार
· विविध क्षेत्रातील गुंतवणुकीतून 47 हजार थेट रोजगार निर्मिती

राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्राचा मोठा वाटा आहे. उद्योग क्षेत्राच्या व गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राज्यशासन नेहमीच प्रयत्नशील असून उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणुकीचा सकारात्मक अनुभव मिळावा यासाठी शासन कसोशीने प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील विविध ठिकाणी उद्योग, माहिती तंत्रज्ञान, अन्नप्रक्रिया उद्योग, गोदामे, डेटा सेंटर आणि लॉजिस्टिक हब प्रकल्प उभारणीसाठी ₹1,08,599 कोटी गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. याद्वारे सत्तेचाळीस हजार रोजगार उपलब्ध होणार आहे. यावेळी मुख्य सचिव राजेश कुमार, उद्योग विभागाचे सचिव पी. अन्बलगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उद्योग विभागातील वरिष्ठ अधिकारी, विविध उद्योग समूहांचे प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी एमजीएसए रिअ‍ॅलिटी अध्यक्ष अमरप्रकाश अग्रवाल, इंटिग्रेटेड डेटा सेंटर पार्क’ उभारणीसाठी लोढा डेव्हलपर्स लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक लोढा, रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक केतन मोदी, अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचे अध्यक्ष अजित बरोदिया आणि पॉलीप्लेक्स कार्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्य अधिकारी प्रणय कोठारी यांच्यासमवेत राज्य शासनाच्या वतीने उद्योग विभागाचे सचिव पी. अन्बलगन यांनी सामंजस्य करारांचे आदान प्रदान केले.
औद्योगिक गोदामे, डेटा सेंटर आणि लॉजिस्टिक हब उभारणीसाठी एमजीएसए रिअ‍ॅलिटी यांच्या वतीने महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पाच हजार कोटी रुपये गुंतवणूक केली जात असून यातून दहा हजार रोजगार निर्मिती होईल.
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे ‘ ग्रीन इंटिग्रेटेड डेटा सेंटर पार्क’ उभारणीसाठी लोढा डेव्हलपर्स लिमिटेडकडून तीस हजार कोटी रुपये गुंतवणूक करण्यात येत असून या डेटा सेंटर पार्कमुळे 6 हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील लिंगा या ठिकाणी एकात्मिक कोळसा सरफेस वायूकरण डाउनस्ट्रीम डेरिव्हेटिव्ह्ज प्रकल्प उभारणीसाठी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड कडून सत्तर हजार कोटी रुपये गुंतवणूक करण्यात येत असून तीस हजार व्यक्तींना यातून रोजगार उपलब्ध होईल. नंदुरबार येथे पॉलिमेरिक उत्पादनांच्या प्रकल्पासाठी पॉलीप्लेक्स कार्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून 2 हजार 86 कोटी रुपये गुंतवणूक करण्यात येत असून यातून सहाशे व्यक्तींना रोजगार उपलब्ध होईल.
काटोल, नागपूर येथे रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड यांच्याकडून खाद्यपेये आणि अन्न उत्पादनांच्या निर्मितीसाठी एकात्मिक सुविधांसाठी प्रकल्प निर्मितीसाठी १ हजार ५१३ कोटी रुपये गुंतवणूक करण्यात येत असून याद्वारे पाचशे जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page