रूपाली चाकणकर यांना पदमुक्त करा; तृप्ती देसाई यांची मागणी

Photo of author

By Sandhya


सांगली – राज्यात महिला असुरक्षित असल्याचे विविध घटनांवरुन समोर येत असल्यामुळे परिस्थिती गंभीर आहे. सध्या हुंडाबळीतील आरोपींना जामिन मिळतो आणि ते बाहेर उजळ माथ्याने फिरतात.

राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असून महिलांना न्याय मिळत नाही. त्यांना तातडीने पदमुक्त करा. पक्षविरहित चेहरा द्या अन्यथा पदरिक्त ठेवा, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी पत्रकार बैठकीत केली.

देसाई म्हणाल्या, ‘मागील सत्ताकाळापासून महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर या आहेत. वास्तविक महिला आयोग ही स्वायत्त संस्था असल्यामुळे त्याच्या अध्यक्षपदावर राजकीय पक्षाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला राहता येत नाही. परंतु राष्ट्रवादी पक्षाशी संबंधित चाकणकर यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार दिलेला आहे. तो बेकायदेशीर आहे.

करुणा मुंडे, वैष्णवी हगवणे आदी प्रकरणांचे काय झाले हे राज्यापुढे आहे. सत्ताधारी पक्षाशी संबंधित संशयित असतील तर त्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार आयोगाच्या माध्यमातून सुरु आहे. हुंडाबळी कायदा कागदावर अस्तित्वात आहे परंतु त्या कायद्यानुसार किती दोषींना शिक्षा झाली याची आकडेवारी आयोगाने जाहिर करणे गरजेचे आहे.’

मुख्यमंत्र्यांचे कौतुक

देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, ‘मुख्यमंत्री हे कार्यक्षम अधिकारी आहेत. परंतु प्रशासकीय अधिकारी सक्षम नाहीत. त्यामुळे अन्याय झालेल्या महिलांना न्याय मिळत नाही. वैष्णवी प्रकरणानंतर विविध जिल्ह्यातून अन्यायाची प्रकरणे माझ्याकडे येत आहेत. त्यांना न्याय मिळण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून त्यांच्याकडे वस्तुस्थिती मांडणार आहे. लाडक्या बहिणींना सुरक्षा मिळालीच पाहिजे.’

Leave a Comment

You cannot copy content of this page