
पुणे शहरातील बुधवार पेठ येथील मालाबाई वाडा भागात रेड लाईट एरियामध्ये फरासखाना पोलिसांनी केलेल्या अचानक छापामार कारवाईत बांगलादेशी नागरिक असलेल्या ५ महिलांना अटक करण्यात आली आहे. त्या अवैधरित्या भारतात प्रवेश करून पुण्यात वेश्या व्यवसाय करत असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या विशेष आदेशानंतर करण्यात आली. आदेशानुसार, शहरात अवैधरित्या वास्तव्यास असलेले बांगलादेशी नागरिक शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याअनुषंगाने फरासखाना पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रशांत भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र पथकांनी १८ जुलै रोजी ही कारवाई केली.
गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत बांगलादेशातील जैशोर, ढाका, नारायणगंज, नोडाई आणि नरसिंगदी येथील महिलांचा समावेश आहे. त्या बॉर्डर पार करत बेकायदेशीर मार्गे भारतात आल्या आणि पश्चिम बंगालमार्गे पुण्यात स्थायिक झाल्या. महिलांनी चौकशीत स्वखुशीने वेश्या व्यवसाय करत असल्याचे कबूल केले आहे.
या कारवाईत फरासखाना गुन्हे शाखा, एटीसी पथक तसेच महिला अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला. यामध्ये महिला पोलिस कर्मचाऱ्यांचीही मोलाची भूमिका राहिली. या कारवाईतून पुण्यातील रेड लाईट एरियामधील अवैध व विदेशी नागरिकांच्या हालचालींवर पोलिसांकडून ठेवलेला बारीक लक्ष अधोरेखित होते.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर आयुक्त रंजनकुमार शर्मा, राजेश बनसोडे, डीसीपी कृषिकेश रावले आणि सहाय्यक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पोलिसांनी संबंधितले महिलांविरोधात विदेशी नागरिक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.