लोकाभिमुख सामाजिक संस्थाचा आधारस्तंभ हरपला

Photo of author

By Sandhya

लोकमान्य टिळक यांचे पणतू, केसरीचे विश्वस्त डॉ. दीपक टिळक यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. १६:- ‘लोकमान्य टिळक यांचा महाराष्ट्रातील समाजकारणातील विविधांगी क्षेत्रातील वारसा समर्थपणे चालविणारे लोकाभिमुख, मार्गदर्शक असे व्यक्तिमत्व डॉ. दीपक टिळक यांच्या निधनामुळे अनेक सामाजिक संस्थांचा आधारस्तंभ हरपला आहे,’ अशा शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमान्य टिळक यांचे पणतू, दैनिक केसरीचे विश्र्वस्त, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक जयंत टिळक यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, लोकमान्य टिळक आणि त्यांचे नातू दिवंगत जयंत टिळक यांच्याकडून मिळालेला वारसा डॉ. दीपक टिळक यांनी समर्थपणे चालविला. ते राजकारणात फारसे रमले नाहीत. पण लोकमान्य टिळक यांनी पाया घातलेल्या दैनिक केसरी तसेच शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्य त्यांनी तितक्याच जबाबदारीने सांभाळले. यातून ते कित्येक सामाजिक संस्था, संघटना, विश्वस्त मंडळांचे आधारस्तंभ ठरले. त्यांच्या पुढाकाराने अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांना समाजातून पाठबळ मिळत राहिले. डॉ. टिळक हे व्यवस्थापन आणि पत्रकारिता क्षेत्रातील अभ्यासक, संशोधक राहिले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक होतकरू युवकांनाही या क्षेत्रातील संशोधनाची प्रेरणा मिळाली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात भरीव असे कार्य केले आहे. डॉ. दीपक टिळक यांच्या निधनामुळे राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील एक मार्गदर्शक असे उत्तुंग व्यक्तिमत्व हरपले आहे. ही या क्षेत्रासाठी हानी आहे. डॉ. टिळक यांच्या निधनामुळे त्यांच्या परिवारावर, विविध संस्था, संघटना आणि सामाजिक उपक्रमांशी निगडित कार्यकर्ते यांच्यावर दुःखाचा आघात झाला आहे. या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना हे दुःख सहन करण्याची ताकद मिळो, अशी ईश्वराला प्रार्थना करतो. डॉ. दीपक टिळक यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो आणि त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

0000

Leave a Comment

You cannot copy content of this page