वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत 21 शिकारी ताब्यात

Photo of author

By Sandhya

नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील मौजे हडसर येथील वनकक्ष क्र. १३७ मध्ये मोठ्या संख्येने अज्ञात इसम संशयितरित्या वन्यप्राण्याच्या शिकारीच्या उद्देशाने फिरत असल्याबाबत प्राप्त गोपनीय माहितीनुसार (दि.१३ मे) रोजी वनपरिक्षेत्र जुन्नरच्या स्टाफने सदर ठिकाणी नियोजित धाड टाकून मौजे सुराळे येथील १५ जण, मौजे हडसर येथील ४ जण तसेच मौजे तेजूर व मांगणेवाडी (खामगाव) येथील प्रत्येकी १ जण अशा एकूण २१ इसमांवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९ व ५१ अन्वये वनपरिमंडळ राजूर रा. गु. क्र. WL ०२/२०२५ नोंद करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याबाबत वनरक्षक, राजूर एकनाथ धोंडू बांगर यांना प्राप्त गोपनीय माहितीनुसार मौजे हडसर येथील वनकक्ष क्र. १३७ मध्ये २० ते २५ इसम वाघुरीच्या सहाय्याने वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने सदर शासकीय राखीव वनात फिरत असल्याबाबत माहिती मिळाली असता त्यांनी वनरक्षक निमगिरी व वनरक्षक आपटाळे यांचेसमवेत घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सदर इसमांनी राखीव वनक्षेत्रामध्ये ठिकठिकाणी वाघुरी लावले असल्याचे तसेच वाघुरीच्या दिशेने वन्यप्राण्यांना हुसकावत असल्याचे दिसून आल्याने त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी, जुन्नर प्रदीप चव्हाण यांना त्याबाबत कळविले असता श्री. चव्हाण यांनी घटनास्थळी अतिरिक्त मनुष्य बळ पाठविले असता सदरील सर्व इसमांना घटनास्थळी वन्यप्राण्यांच्या शिकारीकरिता त्यांनी आणलेल्या एकूण २१ वाघुरी, त्याचे वाहतूकीकरिता वापरण्यात आलेल्या १० दूचाकी वाहने घटनास्थळी जप्त करण्यात आले.

सदर सर्व २१ इसमांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हयाची कबूली दिली असून मौजे सुराळे येथील आरोपी निलेश मच्छिंद्र केदारी, रमेश ज्ञानेश्वर केदारी, प्रदीप किसन केदारी व मौजे हडसर येथील किसन केशव भले हे तपास कामामध्ये सहकार्य करीत नसल्याने तसेच तपासकामी दिशाभूल करणारी माहिती देत असल्याने त्यांना काल दि. १३/०५/२०२५ रोजी सायंकाळी अटक करण्यात येऊन त्यांना आज मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, जुन्नर यांचे न्यायालयात हजर करण्यात आले. वनविभागाच्या वतीने वनपरिक्षेत्र अधिकारी जुन्नर प्रदीप चव्हाण यांनी युक्तिवाद केला असता मा. न्यायालयाने वरील चारही आरोपी यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्यातील अन्य १७ आरोपींनी गुन्हयाबाबतची कबूली दिली असून त्यांना बंधपत्रावर मूक्त करण्यात आलेले आहे.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी स्पष्ट केले की, “वन्यप्राण्यांना त्यांच्या अधिवासातून पळवून लावणे, त्याचे शिकारीकरिता फासकी/ वाघूर लावणे वा त्याची शिकार करणे इ. कृत्ये वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९ चे उल्लंघन असून अशा उल्लंघनाकरिता जास्तीत जास्त ७ वर्षे कारावासाची तसेच रु. २५०००/- पर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. सदरचा गुन्हा हा अजामीनपात्र तसेच दखलपात्र स्वरूपाचा आहे. यास्तव वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.”

सदरची कारवाई जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस, सहाय्यक वनसंरक्षक अमृत शिंदे व वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, जुन्नर तसेच वनपरिक्षेत्र, जुन्नर संयुक्त पथकाने यशस्वी केली.

Leave a Comment