
“विद्यार्थिनींचा छळ म्हणजे संवेदनहिनतेचं भयंकर उदाहरण”- डॉ. नीलम गोऱ्हे
ठाणे, दि. १० जुलै २०२५ : शहापूर येथील एका इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थिनींची मासिक पाळी तपासण्याच्या बहाण्याने विवस्त्र करून छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकारावर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. “ही घटना म्हणजे संवेदनहिनतेचं भयंकर उदाहरण असून, अशा कृत्यांना पूर्णपणे पाठीशी घालता येणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
८ जुलै रोजी घडलेल्या या घटनेत शाळेतील मुख्यध्यापिका, पाच शिक्षिका, दोन महिला कर्मचारी आणि एका शिपायावर पॉक्सो कायदा तसेच BNS कलम ७४ आणि ७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाथरूममध्ये सापडलेल्या रक्ताच्या डागांचे फोटो प्रोजेक्टरवर दाखवत विद्यार्थिनींची खुलेआम मासिक पाळीबाबत विचारणा करण्यात आली. ज्या मुलींना मासिक पाळी आली नव्हती, त्यांना जबरदस्तीने कपडे उतरवून तपासण्यात आल्याचा आरोप पालकांनी केल्याने ही घटना उघडकीस आली.
या गंभीर प्रकरणी डॉ. गोऱ्हे यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी यांच्याशी तातडीने संपर्क साधून माहिती घेतली. त्यांनी सांगितले की, गुन्हा रजिस्टर नंबर २११/२०२५ अन्वये दाखल करण्यात आलेला आहे. “शिक्षण संस्थेमध्ये अशा प्रकारचा अमानवी वागणूक दिली जाणं हा अत्यंत गंभीर विषय आहे. मी शिक्षण मंत्र्यांकडे तसेच संबंधित विभागांकडे मुलींना आरोग्यविषयक वैज्ञानिक माहिती आणि संवेदनशीलता पूर्वक शिकवली जावी, अशी मागणी केली आहे,” असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
याचप्रमाणे सांगलीतील एका अल्पवयीन मुलीने चार मुलांकडून सतत होणाऱ्या मानसिक त्रासामुळे आत्महत्या केल्याच्या घटनेबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. “मी सांगलीच्या पोलीस अधीक्षकांशी बोलले असून, चारी आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र अशा घटना टाळण्यासाठी विद्यार्थिनींनी ११२ क्रमांकावर तातडीने मदत मागावी, अथवा आमच्याशी थेट संपर्क साधावा, असे माझे आवाहन आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
“आपण मुलींना समजून घेणाऱ्या, त्यांना आधार देणाऱ्या आणि त्यांचं मनोबल वाढवणाऱ्या शिक्षण व्यवस्थेकडे वळण्याची गरज आहे. हा प्रश्न केवळ कायद्याचा नाही, तर सामाजिक जागृतीचाही आहे,” असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ठामपणे सांगितले.