
बारामती, दि. ५: शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक हा अत्यंत संवेदनशील विषय असून त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, वाहतूक सुरक्षाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करुन त्यांची सुरक्षितरित्या वाहतूक करावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी केले.
बारामती, दौंड आणि इंदापूर तालुक्यातील शालेय विद्यार्थी वाहतूक संघटनाना विद्यार्थी वाहतूक सुरक्षितता नियमांबाबत माहिती होण्यासोबतच या नियमांचे पालन व्हावे याकरिता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे रविवारी (३ ऑगस्ट) आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी सुमारे १०० हून अधिक चालक व मालक उपस्थितीत होते.
श्री. निकम म्हणाले, शालेय विद्यार्थी वाहतूक बस नियमावलीअंतर्गत शासनाने घालून दिलेल्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करावे. सुरक्षित वाहतुकीच्यादृष्टीने वाहन परवाना, विमा, वाहनाची योग्यता, प्रदूषण तपासणी प्रमाणपत्र, परवानाधारक चालक व वाहकांची संपूर्ण माहिती अद्ययावत ठेवणे अनिवार्य आहे. वाहनावर ‘स्कूलबस’ अशी ओळख पट्टी, आपत्कालीन स्थितीत बाहेर पडण्याचा मार्ग, प्रथमोपचार पेटी, अग्निशामक यंत्र आदी सुविधा बसमध्ये असणे बंधनकारक आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, शाळेच्या परिसरात वाहन सुरक्षित चालवावे. वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळावा, विद्यार्थ्यांची बसमध्ये चढ-उतार करताना तसेच रस्ता ओलांडताना विद्यार्थ्यांचे अपघात होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. वेगमर्यादेचे पालन करुन सुरक्षितरित्या वाहन चालवावे. वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
बसचे चालक, वाहक मद्यपान करीत नसल्यासोबत ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नसावेत. बसमधील सर्व प्रवाशांचा विमा अद्ययावत असावा. वाहनात कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर फेरबदल करू नये. वाहतूकदारांनी विद्यार्थ्यांच्या पालकांचा विश्वास जपला पाहिजे. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची गांभिर्याने दखल घेऊन नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे, असे आवाहन श्री. निकम यांनी केले.
बैठकीत वाहनांची तपासणी करण्याच्या अनुषंगाने नियमांचे पालन करण्याबाबत माहिती देण्यात आली. तसेच वाहन मालक, चालकांच्या समस्यांबाबत माहिती घेण्यात आली.
यावेळी मोटार वाहन निरीक्षक गंगाधर मेकलवार, सहायक मोटार वाहन निरीक्षक रजत काटवटे, विद्यार्थी वाहतूक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष तानाजी बांदल, पश्चिम महाराष्ट्र विद्यार्थी वाहतूक संघटनेचे उपाध्यक्ष दीपक वाघमारे, जिल्हाध्यक्ष जाहीद बागवान, बारामती तालुकाध्यक्ष गणेश सावंत, दौंड तालुकाअध्यक्ष राजू साठे, इंदापूर तालुकाध्यक्ष विशाल कांबळे, अनिल गोलांडे, संतोष तरटे, नानासो गावडे, भूषण आगवणे आदी उपस्थित होते.
0000