शिक्षक-पालक यांचा सुसंवाद हीच समृद्ध शिक्षणव्यवस्थेची किल्ली

Photo of author

By Sandhya


– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 
गुणवत्तापूर्ण शिक्षण, तंत्रज्ञानाचा वापर आणि शिक्षक-पालक यांचा सुसंवाद हीच भविष्यातील समृद्ध शिक्षणव्यवस्थेची किल्ली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नवीन शैक्षणिक वर्ष २०२५–२६ च्या प्रारंभाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, दुर्वेस येथे भेट देत नवप्रवेशित विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तक वाटप करून त्यांचे औपचारिक स्वागत केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी त्यांचे मनोबल वाढवले. तसेच औषधी वन उद्यानात वृक्षारोपण करून पर्यावरणपूरक संदेश दिला.मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी डिजिटल क्लासरूम, आयसीटी लॅब, विज्ञानप्रयोगशाळा, ग्रंथालय, औषधी वन उद्यान, टेरेस गार्डन आदी सुविधांची पाहणी करत त्याबाबत समाधान व्यक्त केले. पीएमश्री योजनेंतर्गत विकसित झालेली ही शाळा जिल्ह्यातील एक आदर्श शाळा म्हणून ओळखली जाते.
मुख्यमंत्र्यांनी उपस्थित पालकांशी थेट संवाद साधत त्यांचे अनुभव जाणून घेतले. यावेळी पालकांनी अभिमानाने सांगितले की, “या शाळेमध्ये मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते, शिक्षकांची मेहनत दिसून येते, विविध उपक्रम राबवले जातात, यासाठी आम्ही मुलांना या शाळेत पाठवतो, तसेच विद्यार्थ्यांना डिजिटल बोर्डावर लिहिण्याचाही सराव दिला जातो. आधुनिक शिक्षण पद्धतीचा लाभ मिळतो.” या गोष्टी ऐकून मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी समाधान व्यक्त करत पालक, शिक्षक आणि शिक्षण विभागाच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
या कार्यक्रमास वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार सर्वश्री विलास तरे, राजन नाईक, राजेंद्र गावित, निरंजन डावखरे, शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय. एन. कुंदन, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सोनाली मातेकर, तसेच विविध विभागप्रमुख, शिक्षकवर्ग, मुख्याध्यापिका, पालक व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Leave a Comment

You cannot copy content of this page