शिरूर तालुक्यात पहाटे ३ ठिकाणी बिबटे जेरबंद – वनपरिक्षेत्र अधिकारी निलकंठ गव्हाणे यांची माहिती – ७ नवीन पिंजरे शिरूर विभागासाठी दाखल

Photo of author

By Sandhya


शिरूर तालुक्यात सध्या अनेक ठिकाणी ऊस तोड सुरू असून बिबट्यांचे शेतकऱ्यांसह नागरिकांना सातत्याने दर्शन होत आहे. पिंपरखेड,जांबुत परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात मागील महिन्यात ३ बळी गेल्यानंतर वन विभाग अलर्ट मोडवर असून बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी ज्या काही महत्वाच्या उपाय योजना करता येतील त्या प्राधान्याने बिबट प्रवण क्षेत्रात राबविताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर काल दि. ३ रोजी शिरूर वनपरिक्षेत्र कार्यालयात ७ नवीन पिंजरे दाखल झाले असल्याची माहिती शिरूरचे वन परिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी दिली.
दरम्यान आज दि. ४ ला पहाटे शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील फियाट कंपनी जवळ रात्री लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या अडकला. हा बिबट्या अंदाजे ४ वर्षांचा असून त्याची तात्काळ माणिकडोह निवारा केंद्राकडे रवानगी करण्यात आली.तर पिंपरखेड येथे लावलेल्या पिंजऱ्यात अंदाजे ५ वर्षे वयाचा नर बिबट जेरबंद झाला.रावडेवाडी (कवठे येमाई जवळ) आज पहाटेच अंदाजे ४ वर्षे वयाची बिबट मादी जेरबंद झाली आहे. या जेरबंद झालेल्या या ३ तीन बिबटयांची तात्काळ माणिकडोह निवारा केंद्राकडे रवानगी करण्यात आली. दरम्यान बिबट्यांपासून बचावासाठी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अजून ही काही प्रभावी उपायोजना काय राबविण्यात येऊ शकतात याचा ही प्राधान्याने विचारविनिमय सुरु असल्याची माहिती शिरूरचे वन परिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी दिली.बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी शासनाचा वन विभाग सतर्क झाला असला तरी शेतावर वस्ती करून राहणारे शेतकरी,मजूर वर्ग व नागरिकांनी आपल्या व आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती दक्षता व खबरदारी घेण्याचे आवाहन युवा क्रांती फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी, राष्ट्रीय किसान मंच चे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव शेलार,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा.सुभाष अण्णा शेटे,राष्ट्रीय किसान मंचच्या पश्चिम महाराष्ट्र महिला संघटक श्रीमती वर्षा नाईक यांनी केले आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page