
करंजविहीरे येथे तीन घरे जळून खाक
शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत गुरुवारी खेड तालुक्यातील तळशेत, करंजविहिरे येथे घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन तीन घरे जळून खाक झाल्याची घटना घडली.
लक्ष्मी बाळू दिवेकर, मोहन महादू दिवेकर व विठ्ठल गजाबा कोळेकर यांची घरे या आगीत भक्ष्यस्थानी पडली. स्फोटामुळे आगीचे तांडव सगळीकडे पसरल्याने तिन्ही घरांतील सर्व साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घरातील महत्त्वाची कागदपत्रे, दागिने, बचत रक्कम तसेच पोस्टाच्या योजनेतून जमविलेले पैसे आगीत जळाल्याने संबंधित कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच चाकण नगरपरिषद अग्निशामक दलाची वाहने तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी ग्रामस्थांच्या मदतीने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवून आग आटोक्यात आणली.
दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. प्रशासनाला त्यांनी तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. बुट्टे पाटील मित्र मंडळाच्या वतीने यावेळी बाधित गरीब महिलांना आधार देण्यासाठी आणि तात्पुरत्या व्यवस्थेसाठी जागेवरच ५२ हजार रुपयांची मदत गोळा करून निराधार नागरिकांकडे सुपूर्द केली. प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.