

देऊळवाले समाजातील लाभार्थ्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात आल्याची भावना व्यक्त करत प्रशासनाचे मानले आभार
बारामती, दि. ३०: महाराजस्व अभियानांतर्गत उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पूजा गार्डन, सुपे येथे आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात १ हजार १९० लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड तहसीलदार गणेश शिंदे सहाय्यक गटविकास अधिकारी नंदन जरांडे आदी उपस्थित होते.
या शिबारात ९० जिवंत सातबारा, २७ संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनांचा लाभ, ११० जातीचे प्रमाणपत्र, १२४ रहिवाशी दाखले, १८ नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, ५७ प्रधानमंत्री आवास योजना ८ अ उतारा, ९४ आधारकार्ड यांच्यासह कृषी विभागाच्या १४ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ, पुरवठा शाखेच्या वतीने २४६ तर २४१ लाभार्थ्यांची ईकेवायसी असे एकूण १ हजार १९० लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले. यामध्ये नागरिकांना महाडीबीटी संकेतस्थळ तसेच ई-केवायसीच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात आली.
श्री. मापारी म्हणाले, श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबाराअंतर्गत शेतकरी व ग्रामस्थांच्या तक्रारीचे जलद निराकरण करण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचे महसूल विभागाच्या संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करून त्यांच्या तक्रारी निकालात काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी मंडळस्तरावर या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यापूढेही हे अभियान राबवून नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.
यावेळी श्री. मापारी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
देऊळवाले समाजातील नागरिक सतत स्थलांतर करीत असतात, त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्रे नसतात, त्यामुळे ते शासनाच्या विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. याबाबींचा विचार करता प्रशासनाने तत्परता दाखवत आज ४५ नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र उपलब्ध करण्यात दिले.
या नागरिकांना जातीचे दाखले मिळवून देण्यासाठी सरपंच, स्थानिक लोकप्रतिनिधी आदींचे मोलाचे सहकार्य लाभले. गाव पातळीवर प्रचार प्रसिद्धी करण्यात आली. आज कार्यक्रमात देऊळ समाजातील लाभार्थ्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात आल्याची भावना व्यक्त करुन प्रमाणपत्र उपलब्ध करुन दिल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले. प्रशासनाच्या प्रयत्नामुळे शासनाच्या विविध योजनांचे लाभास ते पात्र झाले आहेत.