
कर्जत :: श्री.संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी पालखी सोहळा गुरुवारी दि.२६ जून रोजी मिरजगाव येथे सालाबादप्रमाणे मुक्कामी येत आहे.
सकळही तीर्थे निवृत्तीच्या पायी, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम…. ज्ञानेश्वर माउली तुकाराम, असा हरिनामाचा गजर करत राज्यभरातील दिंड्या पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहेत. टाळ मृदुंगाच्या तालात, हरिनामाच्या गजरात पंढरीची वारी भक्तिरसात न्हाहून निघाली आहे.
अशा भक्तिमय वातावरणात श्री.क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री.क्षेत्र पंढरपूर या ४५० किलोमीटर अंतर पायी निघालेल्या
साडेतीनशे वर्षांची अखंडीत परंपरा असलेली श्री.संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे अहिल्यानगर जिल्ह्यात आगमन झाले आहे.
यानिमित्ताने मिरजगावकरांनी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे.
श्री.क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री.क्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या श्री.संत निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी पालखी सोहळ्याचे मिरजगावमध्ये गुरूवारी आगमन होणार आहे.
या अनुषंगाने पायी दिंडी पालखी सोहळ्यातील हजारो सहभागी वारकऱ्यांच्या भोजनाची, निवासाची तसेच पिण्याच्या पाण्याची व आरोग्याची सुविधा, सुरक्षितता याबाबत तयारी करण्यात येत आहे.
मिरजगाव परिसरातील भाविक भक्तांनी या पायी दिंडी पालखी सोहळ्यानिमित्त जास्तीत जास्त सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नियोजन समिती व समस्त मिरजगाव ग्रामस्थांच्या वतीने जयकुमार कोठारी, भाऊसाहेब बावडकर, अंकुश खराडे, रोहिदास यादव, राम बावडकर, उद्धव बावडकर, संपत शेलार, लक्ष्मण बावडकर यांनी केले आहे..