संशोधन म्हणजे फक्त शोधनिबंध नव्हे, तर शेतकऱ्याच्या जीवनात दिसणारा बदल

Photo of author

By Sandhya

  • कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांनी आपल्या संशोधनातून थेट शेतकऱ्याच्या उत्पादनक्षमतेत, उत्पन्नात आणि टिकाऊ शेतीत परिवर्तन घडवतील अशा प्रकारचे निष्कर्ष द्यावेत, संशोधन म्हणजे फक्त शोधनिबंध नव्हे, तर शेतकऱ्याच्या जीवनात दिसणारा बदल असून हीच खरी मोजमापाची कसोटी आहे, अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
महाराष्ट्र शासन, कृषी विभाग आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे येथे 29 ते 30 ऑक्टोबर 2025 दरम्यान आयोजित “महाराष्ट्रातील कृषी संशोधन परिसंस्थेची पुनर्रचना: निष्पत्तीकडून प्रभावाकडे” (Redefining Agriculture Research Ecosystem in Maharashtra: From Outputs to Impact) या दोन दिवसीय कार्यशाळेचं उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते.
श्री. भरणे म्हणाले, “राज्याच्या कृषी क्षेत्राला हवामान बदल, कमी उत्पादन, बाजारपेठेतील अनिश्चितता आणि तंत्रज्ञानाचा संथगतीने वापर अशा विविध समस्यांचा सामना करावा लागतो आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील कृषी विद्यापीठांनी आपले संशोधन केवळ पुस्तकी ज्ञान न ठेवता, ते शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, आणि उद्योगांसाठी उपयुक्त आणि मापनयोग्य प्रभाव देणारे, गरजांवर आधारित उपाय म्हणून विकसित करावं. मला विश्वास आहे की, या प्रशिक्षण शिबिरातून तज्ज्ञ मंडळी नवे आयाम ओळखून प्रयोगशील शिक्षणाची नवी दिशा ठरवतील.
ते पुढे म्हणाले, कृषी संशोधनाचं केंद्र शेतकरी असला पाहिजे. प्रयोगशाळेत तयार होणारं प्रत्येक संशोधन, प्रत्येक नवतंत्रज्ञान शेतकऱ्याच्या शेतात उपयोगी आले पाहिजे आणि त्याच्या उत्पादनात आणि उत्पन्नात वाढ केली तरच त्या संशोधनाला खरा अर्थ प्राप्त होईल. आज आपण ‘निष्पत्तीकडून प्रभावाकडे’ या परिवर्तनाच्या टप्प्यावर आहोत. केवळ अहवालातील निष्कर्ष नव्हे, तर त्यातून दिसणारा परिणाम हा शेतकऱ्याच्या समृद्धीतून मोजला जाणार आहे. महाराष्ट्रातील कृषी संशोधन व्यवस्था आता प्रयोगशाळेत नव्हे, तर शेतात आणि बाजारपेठेत परिणाम घडवणाऱ्या युगात प्रवेश करत आहे. संशोधनाचं मोजमाप शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरच्या समाधानाच्या हास्यात दिसलं, तरच आपलं उद्दिष्ट पूर्ण झालं असं म्हणता येईल.” ते उद्घाटन कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते.
“आपले कृषी संशोधन हे पुस्तकांपुरते आणि प्रयोगशाळांपुरते मर्यादित राहिले, पण आता काळाची गरज वेगळी आहे. शेतकऱ्यांपर्यंत हे ज्ञान पोहोचवणे, त्यांच्या अडचणींवर आधारित उपाय शोधणे आणि प्रत्येक प्रयोगाला शेतात उतरवणे हाच या कार्यशाळेचा खरा उद्देश आहे. कार्यशाळेतून कृषी विद्यापीठांसाठी संशोधनातील त्रुटी आणि प्राधान्य क्षेत्रे निश्चित होतील. शेतकऱ्यांवर केंद्रित आणि परिणाम-आधारित संशोधनाची संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे विकसित होईल. सहभागींच्या संशोधन प्रस्ताव लेखन कौशल्यात सुधारणा होईल. विविध संस्थांमध्ये सहयोगी भागीदारी मजबूत होतील. डेटा आणि आधुनिक माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान साधनांच्या सामर्थ्याबद्दल अधिक जागरूकता वाढेल. या कार्यशाळेतून शेतकरी-केंद्रित संशोधनाची संकल्पना अधिक स्पष्ट होऊन कृषी क्षेत्राच्या विकासाला नवी गती मिळेल अशी मला अपेक्षा आहे.
यावेळी केंद्रीय कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ. मांगी लाल जाट, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, महासंचालक वर्षा लड्डा-उंटवाल, उपसचिव प्रतिभा पाटील, श्रीकांत आंडगे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. किशोर शिंदे, कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञ, भारतीय अनुसंधान परिषद संस्थांचे प्रतिनिधी, कृषी विभागाचे अधिकारी, शेतकरी उत्पादक कंपन्या प्रगतीशील शेतकरी उपस्थित होते.

Leave a Comment

You cannot copy content of this page