समस्यांच्या विळख्यात अडकले मुलांचे शासकीय वसतिगृह

Photo of author

By Sandhya

विद्येच्या माहेरघरातच वसतिगृह बनले तळी रामाचा अड्डा

घाणीच्या साम्राज्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरातील मुलांचे शासकीय वसतिगृह समस्यांच्या विळख्यात अडकून हे वसतिगृह तळीरामाचा अड्डा बनल्याने व येथील घाणीच्या साम्राज्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आल्याने येथील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
विद्येचे माहेरघर म्हणून शहराची देशाच्या कानाकोपऱ्यात ओळख आहे.त्यामुळे समाजातील मागासवर्गीय,इतर मागासवर्गीय मधील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये.याबरोबरच त्यांना शिक्षणाचा लाभ मिळावा या उद्देशाने सामाजिक न्याय विभागाचे समाजकल्याण विभागामार्फत येरवडा येथे शासकीय मुलांचे वसतिगृह दोन ठिकाणी अशा पाच मजली इमारत उभारून दोन्ही इमारती मिळून जवळपास चारशे ते पाचशे खोल्या बांधण्यात येऊन त्यांना १,२,३,४असे क्रमांक देऊन या ठिकाणी राज्यातील विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आल्याने अनेक विद्यार्थी प्रशासनाच्या योग्य उपाययोजनेमुळे शिक्षणाचा लाभ घेत आहे. मात्र येथे असलेल्या विद्यार्थ्यांना अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे विविध समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
जवळपास अंदाजे आठ ते नऊ एकरमध्ये वसलेल्या या कार्यालयाच्या आवारात मोकाट कुत्र्यांचा वावर जास्त प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे रात्रीच्या सुमारास समाजकल्याण कार्यालयाच्या आवारात प्रवेश करताच विद्यार्थ्यांना मोकाट कुत्र्यांमुळे जीव मुठीत घेऊन जाण्याची वेळ येत आहे. त्यामुळे येथे असलेले सुरक्षा रक्षक असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था विद्यार्थ्यांची झाली आहे. तर सांडपाणी वाहून जाण्यासाठी परिसरातून ड्रेनेज लाईन टाकण्यात आली आहे. मात्र ती सफाई कामगारांच्या वतीने साफ करण्यात येत नसल्याने असलेली ड्रेनेज लाईन तुंबत असून त्यातील सांडपाणी रस्त्यावर साचून परिसरात दलदल निर्माण होऊन डासांच्या प्रमाणात वाढ होऊन विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तर परिसरात पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पावसाळी लाईन टाकण्यात आली पण त्याच्यावरील लोखंडी जाळ्यांची झाकणे तुटल्याने रात्रीच्या सुमारास अशा ठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. वसतिगृहाच्या आवारात विद्यार्थ्यासाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहेत.पण त्याची देखील दुरवस्था होऊन ते तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. येथील आवारात झाडेझुडपे वाढल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढल्याने रात्रीच्या सुमारास याची देखील धास्ती विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत आहे.
विशेष करून हा परिसर मुलांचे शासकीय वसतिगृह म्हणून परिचित असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी व अनुचित घटना टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने तीन ते चार सुरक्षा रक्षक नेमण्यात आले असताना देखील रात्रीच्या सुमारास या ठिकाणी अनेक जण दारू पिण्याचा आनंद लुटत असल्याने असलेले वसतिगृह हे तळीरामाचा अड्डा बनल्याने परिसरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. वसतिगृहाच्या आवारात अनेक ठिकाणी दारूच्या मोकळ्या बाटल्या अस्ताव्यस्त अवस्थेत पडल्याचे पाहायला मिळत आहे.त्यामुळे येथे सुरक्षा रक्षक नेमून व सहायक आयुक्त कार्यालय उभारून उपयोग काय?असा सवाल अनेकांकडून उपस्थित होत आहे.विशेष करून सहायक आयुक्तांच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या जिन्याखाली अनेकदा कचऱ्याचे ढिग आढळून येत आहेत. त्यामुळे हे कार्यालय कचऱ्याचे आगार बनले आहे. तर स्वच्छतागृहातील नळाला अक्षरशः दोरीने बांधण्याची वेळ येत आहे. जर अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे जर समाजकल्याण विभागाची अशा प्रकारची दुरवस्था झाली असेल तर येथे राहणारे विद्यार्थी खरोखरच सुरक्षित आहेत का? हा मुख्य प्रश्न उपस्थित होऊन चार महिन्यांपूर्वी येथील विद्यार्थ्यांना चक्क विविध मागणीसाठी उपोषण करण्याची वेळ आल्याने येथील शासकीय वसतिगृहाची काय? अवस्था असेल हे सांगणे कठीण आहे.तर विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी येणाऱ्या नातेवाईकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या या वागणुकीमुळे पालकवर्ग देखील येथे कार्यालयात येताना जीव मुठीत घेऊन येत आहे.समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ मिळावा याकरिता हे वसतिगृह उभारले गेले असताना देखील येथे इमारतींची सुधारणा जरी करण्यात आली असली तरी पण परिस्थिती जैसे थे आहे. याबरोबरच येरवडा हद्दीमध्ये हे कार्यालय येत असताना वसतिगृहाच्या इमारतीस विश्रांतवाडी असे नामकरण करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून अधिक माहितीसाठी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. तरी दुरवस्थेत अडकलेल्या येथील वसतिगृहाची सुधारणा करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
येथील वसतिगृह परिसराची एवढ्या मोठ्या प्रमाणात बिकट अवस्था झाली आहे की,येथे विद्यार्थी कसे राहत असतील हा प्रश्न सतावत आहे.त्यामुळे येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांची योग्य ती सुविधा करण्यात यावी.,नागेश देडेसामाजिक कार्यकर्ता

Leave a Comment

You cannot copy content of this page