सातमजली भव्य शनिवारवाडा पाहण्याची पुणेकरांना सुवर्णसंधी

Photo of author

By Sandhya


इतिहास प्रेमी मंडळ आणि लोकमान्य कल्चरल फाउंडेशनतर्फे शनिवारवाड्याची भव्य प्रतिकृती : दिनांक १८ ते २६ ऑक्टोबरदरम्यान प्रदर्शन

पुणे : यंदाच्या दिवाळीत पुणेकरांना ऐतिहासिक सात मजली शनिवार वाडा पाहण्याची संधी मिळणार आहे. अटक ते कटक अशा विशाल हिंदवी साम्राज्याचा केंद्रबिंदू राहिलेला शनिवारवाडा प्रतिकृतीच्या रूपात पुणेकरांसमोर साकारला जाणार आहे. दिनांक १८ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत, सकाळी १० ते १ आणि सायंकाळी ५ ते १० या वेळेत नवीन मराठी शाळा, शिंदे पार, शनिवार पेठ, पुणे येथे शनिवार वाड्याची साकारण्यात आलेली सात मजली प्रतिकृती पाहता येणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष व इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांनी दिली.

इतिहास प्रेमी मंडळ आणि लोकमान्य कल्चरल फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित या उपक्रमाचे हे विसावे वर्ष आहे. श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या तिनशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त या वर्षी ‘शनिवारवाडा’ हा विषय निवडण्यात आला आहे. चाळीस फूट भव्य प्रतिकृती, अभ्यासपूर्ण निवेदन आणि आधुनिक एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या वैशिष्ट्यांमुळे हे प्रदर्शन अधिक आकर्षक ठरणार आहे.

मोहन शेटे म्हणाले, या प्रदर्शनात भव्य दिल्ली दरवाजा, नऊ बुरुजांची तटबंदी, हजारी कारंजे, रहाटाची विहीर, गणेश महाल, चिमणबाग, तसेच पंतप्रधानांच्या गादीची जागा अशा अनेक ऐतिहासिक वास्तूंची प्रतिकृती पाहता येईल. तसेच युद्धातील विजयांनंतर पुण्यात निघणाऱ्या विजयमिरवणुकीचे देखील दर्शन या प्रदर्शनात घडणार आहे. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Comment

You cannot copy content of this page