


मालेगाव तालुक्यातील सातमाने शिवारात एम एन ग्रीनफिल्ड एनर्जी या कंपनीमध्ये टायर जाळून ऑइल निर्मिती केली जात असल्याने परिसरात प्रदूषण वाढले म्हणून कंपनी कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी ना. दादाजी भुसे यांनी स्थानिक ग्रामस्थांसह पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचेकडे केली आहे .
ऑइल निर्मिती प्रक्रियेमधून मोठ्या प्रमाणात परिसरात प्रदूषण निर्माण होते. सदर प्रदूषणामुळे नागरिकांना श्वास घेण्यास अडचण, डोळ्यात जळजळ, डोकेदुखी व इतर आरोग्य समस्यांमध्ये वाढ झाली असून शेती उत्पादनावर विपरीत परिणाम झालेला आहे. त्यामुळे पर्यावरण संतुलन धोक्यात आलेले आहे. सातमाने परिसरात मोठ्या प्रमाणात दर्जेदार डाळिंब उत्पादन घेतले जाते. हवेतील प्रदूषणामुळे डाळिंब उत्पादनात घट झालेली आहे.
त्यामुळे एम एन ग्रीनफील्ड एनर्जी कंपनी कायमस्वरूपी बंद करावी, यासाठी स्थानिक नागरिकांनी आंदोलने केली होती. त्यामुळे प्रदूषण विभागामार्फत कंपनी बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले होते. परंतु प्रदूषण विभागाच्या आदेशामुळे पुन्हा एकदा कंपनी सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांनी कंपनी कायमस्वरूपी बंद करण्यासाठी ग्रामसभेत ठराव केलेला आहे. म्हणून स्थानिक ग्रामस्थांच्या भावनांचा विचार करता एम एन ग्रीन फील एनर्जी कंपनी ही कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी ना. दादाजी भुसे यांनी पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्याकडे केलेली आहे.
यावर तातडीने निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन नामदार मुंडे यांनी दिले.