
सासवड (पुणे): महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, मुंबई यांच्या आदेशानुसार सासवड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या कार्यक्रमानुसार, सासवड शहरासाठीची प्रारूप प्रभाग रचना १८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत प्रसिद्ध केली जाईल.
ही प्रभाग रचना नगरपरिषदेच्या नोटीस बोर्डवर आणि अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असेल. या प्रभाग रचनेबद्दल नागरिकांना काही हरकती किंवा सूचना नोंदवायच्या असतील, तर त्या लेखी स्वरूपात नगरपरिषद कार्यालयातील आवक-जावक विभागात सादर करता येतील.
मुदतीनंतर आलेल्या हरकती किंवा सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत, अशी माहिती सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी दिली आहे. हरकती किंवा सूचना नोंदवणाऱ्या नागरिकांना त्यांची बाजू मांडण्यासाठी स्वतंत्रपणे सुनावणी दिली जाईल.