

सासवड : अनाथ मुलींशी लग्न लावून देण्याच्या नावाखाली पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा गैरवापर करून जनतेची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. सिंधुताईंच्या ममता बाल सदन संस्थेचे अध्यक्ष दिपक गायकवाड यांनी या संदर्भात निवेदन दिले असून, अशा प्रकारामुळे अनेक लोक फसवणुकीला बळी पडत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाती आणि आश्रम असल्याचे भासवून अनाथ मुलींशी लग्न लावून देण्यासाठी १५ ते २० हजार रुपयांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी फोनवरून येत आहेत. या फसवणुकीसाठी ८४३२५२७२१०७ आणि ९४२३८१७५२३ हे दोन संपर्क क्रमांक दिले जात आहेत, जे ‘सिंधुताई सपकाळ अहमदनगर आश्रम’ नावाने ‘ट्रू कॉलर’वर दिसत आहेत. आश्रमात येण्यापूर्वी फी भरून नोंदणी करणे आवश्यक असल्याचे आणि पैसे दाखविल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, असेही जाहिरातींमध्ये नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करताना दिपक गायकवाड यांनी सांगितले की, ममता बाल सदन (बालगृह) कुंभारवळण, ता. पुरंदर, जि. पुणे या संस्थेत आजवर २२० विवाह पार पडले आहेत आणि त्यासाठी वधू किंवा वर पक्षाकडून एक रुपयाही घेतला गेलेला नाही. त्यांनी स्पष्ट केले की, सध्या माईंच्या ममता बाल सदन संस्थेतच अनाथ मुलींची लग्न लावून दिली जातात आणि ती एकमेव संस्था आहे. मात्र, सध्या संस्थेतील मुली लहान असून, त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत आणि त्या स्वावलंबी होईपर्यंत किमान तीन ते चार वर्षे तरी संस्थेत कोणतेही विवाह होणार नाहीत. अशा परिस्थितीत सुंदर मुलींचे फोटो दाखवून ऑनलाइन १५ हजार रुपये भरण्यास सांगणे हे विकृत मानसिकतेचे लक्षण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
माईंच्या संस्थांबद्दल वस्तुस्थिती:
दिपक गायकवाड यांनी डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याबद्दल आणि त्यांच्या संस्थेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या एकूण ६ संस्था सध्या कार्यरत असून, तेथे ३६० मुले-मुली शिक्षण घेत आहेत:
* वनवासी गोपालकृष्ण बहुउद्देशीय मंडळ, शहापूर (चिखलदरा), जि. अमरावती (स्थापना: १९८६): येथे ६५ आदिवासी मुलींचे शिक्षण होते.
* ममता बाल सदन (बालगृह), कुंभारवळण, ता. पुरंदर, जि. पुणे (स्थापना: १९९३): ही अनाथ मुलींसाठीची पहिली संस्था असून, येथे ७५ मुलींचा सांभाळ होतो. संस्थेने २२० जावई पाहिले आहेत.
* सन्मती बाल निकेतन, मांजरी बु., जि. पुणे (स्थापना: २०००): येथे ४२ मुलांचा सांभाळ करण्यात येतो.
* गोपिका गायरक्षण केंद्र, माळेगाव (ठेका), जि. वर्धा: येथे ३५० गाईंचा सांभाळ केला जातो.
* मन:शांती छात्रालय, शिरूर, जि. पुणे (स्थापना: २०१७):
* गोपाल देशी गो-शाळा, कुंभारवळण (स्थापना: २०१७): येथे ४० गाईंचा सांभाळ केला जातो.
या व्यतिरिक्त अन्य कोठेही माईंची संस्था कार्यरत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आवाहन आणि मागणी:
दिपक गायकवाड यांनी या माहितीचा जास्तीतजास्त लोकांपर्यंत प्रसार करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, माईंच्या नावाचा गैरवापर करून फसवणूक करणाऱ्यांवर वेळीच कठोर आणि दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भोळ्या-भाबड्या लोकांची फसवणूक थांबेल आणि माईंच्या नावाचा गैरफायदा घेणे बंद होईल. त्यांनी संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची विनंती केली आहे. सासवड पोलिसांनी तपास सुरू केला आहे.