
आळंदी : आळंदी-मोशी रोडकडून (इंद्रायणी नगर मार्गे) शहरात जाणारा तसेच दोन्ही बायपासना जोडणारा महत्त्वाचा शिवरस्ता पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हरकतीमुळे रखडलेले हे काम काही महिन्यांपूर्वी सुरू झाले. एका बाजूने सिमेंट काँक्रीटचे काम पूर्ण झाले असले तरी, रस्त्याच्या मधोमध असलेले वीजखांब व डीपी मोठा अडथळा ठरत आहेत.
काम सुरू करताना ठेकेदाराने रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या इलेक्ट्रिक खांब व मुख्य डीपीवरच सिमेंट काँक्रीट रस्ता टाकल्याने वाहतूकदारांसमोर गंभीर धोका निर्माण झाला आहे. रात्री अपरात्री वाहनांची थेट या खांबाला धडक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक व वाहन चालकांनी तातडीने डीपी व खांब काढून सुरक्षित मार्ग मोकळा करावा, अशी मागणी केली आहे.
आषाढी व कार्तिकी यात्रेदरम्यान या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. सध्या काम ५० टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम अद्याप रखडले आहे. यामुळे संभाव्य अपघात व वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.