
पुणे | ८ जुलै २०२५ – सुट्टीवर असतानाही धाव घेत चिमुरडीचा जीव वाचवणाऱ्या कोथरूड अग्निशमन केंद्रातील जवान योगेश अर्जुन चव्हाण यांनी जबाबदारी आणि तत्परतेचा अत्युच्च आदर्श समाजासमोर ठेवला आहे. ही धक्कादायक पण सुखद परिणामी घटना कात्रजमधील खोपडे नगर, सोनवणे बिल्डिंग परिसरात आज सकाळी ९.०६ वाजता घडली.
तिसऱ्या मजल्यावर एका घराच्या खिडकीतून चार वर्षांची भाविका चांदणे ही मुलगी खाली पडण्याच्या स्थितीत दिसत होती. हे लक्षात येताच सुट्टीवर असलेले जवान योगेश चव्हाण यांनी क्षणाचाही विलंब न करता बिल्डिंगच्या दिशेने धाव घेतली.
योगेश चव्हाण सांगतात, “माझ्या बिल्डिंगमधील उमेश सुतार हे जोरात ओरडत होते, आवाज ऐकून मी गॅलरीत आलो. समोरच्या सोनवणे बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावर खिडकीतून एक मुलगी बाहेर अडकलेली दिसली. मी तातडीने तिकडे धाव घेतली.”
जेव्हा ते पोहोचले, तेव्हा घर बंद होते आणि मुलगी घरात एकटी होती. तिची आई दुसऱ्या मुलीला शाळेत सोडून परत येत होती. त्या क्षणी योगेश घटनास्थळी पोहोचले. आईने दरवाजा उघडताच, योगेश यांनी तात्काळ खिडकीतून अडकलेल्या भाविकाला आत खेचून तिचा जीव वाचवला.
“मी अग्निशमन दलात आहे, आणि हीच वेळ खरी कसोटी असते. वर्दीत असो वा नसू, संकटात असलेल्या प्रत्येकाचा जीव वाचवणे हेच खरे कर्तव्य,” असे योगेश चव्हाण यांनी भावनिक शब्दांत सांगितले.
या धाडसी आणि संवेदनशील कृत्यामुळे परिसरात तसेच सोशल मीडियावर जवान योगेश चव्हाण यांचे प्रचंड कौतुक होत आहे. अनेकांनी त्यांना “रिअल लाईफ हिरो” म्हणून गौरवले आहे.
हे धाडस केवळ प्रशंसेपात्रच नव्हे, तर प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरेल!