


दिव्यांचा सण म्हणून साजरी होणारी दिवाळी आपल्यासोबत सुंदर आठवणी, धार्मिक विधी आणि कौटुंबिक परांपरांची आस्था घेऊन येते. दिव्यांच्या प्रकाशाने घर उजळून निघते हृदय कृतज्ञतेने भरते आणि वातावरणात फराळाचा सुगंध दरवळतो. हा दीपोत्सव साजरा करताना वयाचे बंधन आड येत नाही. समस्त कुटुंब एकत्र येते, हास्याची कारंजी उडतात, सगळे मिळून देवाची प्रार्थना करतात आणि कौटुंबिक रिवाज पाळतात. सोनी सबवरील कलाकार- श्रेनु परीख, गरिमा परिहार, समृद्ध बावा, नेहा SK मेहता आणि ऋषी सक्सेना आपल्या दिवाळीच्या आठवणी, धार्मिक विधी आणि सणाचा आनंद द्विगुणित करणाऱ्या भेटी-गाठी याविषयी सांगत आहेत –
‘गाथा शिव परिवार की – गणेश कार्तिकेय’ मालिकेत देवी पार्वतीची भूमिका करणारी श्रेनु परीख म्हणते, “माझ्यासाठी दिवाळी म्हणजे सगळ्यांनी एकत्र येणे आणि परंपरा. मला आठवते आहे, माझ्या आजी-आजोबांकडे आम्ही दिवाळी साजरी करायचो. माझा मामा वेगवेगळे फटाके घेऊन यायचा, माझी आजी मगज, करंज्या आणि बुंदी सारखे सुग्रास पदार्थ बनवायची आणि सगळा परिसर आनंदाने फुलून जायचा. वसूबारसेपासून ते लक्ष्मीपूजन आणि धनाची पूजा करण्यापासून ते रांगोळी काढण्यापर्यंतचे सर्व विधी माझ्या मनात रुतून बसले आहेत. आजही मी तितक्याच उत्साहाने, आनंदाने आणि कृतज्ञ भावनेने माझ्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करते. ‘गणेश कार्तिकेय’ मालिकेत मी सध्या पार्वतीची भूमिका करत असल्याने यंदा हा सण माझ्यासाठी आणखी खास आहे.”
‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत दीप्तीची भूमिका करणारी गरिमा परिहार म्हणते, “दिवाळी मला माझ्या बालपणात घेऊन जाते. माझी चुलत भावंडं आणि मी तासन तास रांगोळी काढण्यात आणि फटाके फोडण्यात घालवायचो. माझी आजी तिचे खास लाडू बनवायची, त्याचा सुगंध अजून माझ्या स्मरणात आहे. वयाने मी कितीही मोठी झाले तरी दिवाळीची बालसुलभ उत्सुकता मात्र तशीच राहील!”
‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत अश्विनची भूमिका करणारा समृद्ध बावा म्हणतो, “माझ्यासाठी दिवाळी म्हणजे प्रकाश, फराळ आणि आनंदीआनंद. दिवाळीच्या आधी माझ्या आईला मी गुजिया बनवण्यात आणि घराची सफाई करण्यात मदत करायचो, ते मला स्पष्ट आठवते आहे. आजही, शूटिंगमध्ये कितीही व्यस्त असलो, तरी मी हा सण माझ्या कुटुंबासोबत आणि मित्रपरिवरासोबत साजरा करतो. आम्ही एकत्र मिळून देवाची आरती करतो आणि फराळावर ताव मरतो. दिवाळी नेहमी आपलेपणा आणि सकारात्मकता घेऊन येते.”
‘इत्ती सी खुशी’ मालिकेत हेतलची भूमिका करणारी नेहा SK मेहता म्हणते, “माझ्यासाठी दिवाळी म्हणजे थोडी उसंत काढून मला घडवणाऱ्या परंपरांचा मान राखणे. मी वडनगरची आहे. आमच्याकडे दिवाळी हा कधीच छानछोकीचा सण नव्हता, तर सगळ्यांनी एकत्र येण्याला महत्त्व होते. घर सजवण्यात, पूजा करण्यात मी मदत करायचे. आम्ही शेजाऱ्यांशी फराळाची देवाणघेवाण करायचो, त्यात खूप आनंद होता. थिएटर आणि पडद्यावर अनेक वर्षे काम केल्यानंतर ते छोटे छोटे विधी आजही मला लोभस वाटतात. दिवाळी म्हणजे केवळ प्रकाश आणि मिठाई नाही तर दिवाळी म्हणजे नूतनीकरण, कृतज्ञता आणि सार्थक गोष्टींची जोपासना.”
‘इत्ती सी खुशी’ मालिकेत संजयची भूमिका करणारा ऋषी सक्सेना म्हणतो, “माझ्यासाठी पाहिल्यापासून दिवाळी म्हणजे अंतर्मुख होण्याचा आणि नातेसंबंधांचा सण आहे. मला आठवते आहे, संध्याकाळी आम्ही सर्व कुटुंबीय एकत्र असायचो, लक्ष्मीपूजा करायचो आणि मग गच्चीत जाऊन फटाके फोडायचो. या छोट्या छोट्या परंपरा सदैव तुमच्यासोबत राहतात. आजही, मला दिवाळी साधेपणाने पण दिवे प्रज्वलित करून, मिठाई वाटून आणि प्रियजनांसोबत समय व्यतीत करून, आपलेपणाने साजरी करायला आवडते.”