

पुणे-हडपसर परिसरातील हांडेवाडी भागात काल महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली. पोलीस बंदोबस्ताच्या संरक्षणात ही कारवाई पार पडली. जेसीबी मशीनच्या सहाय्याने रस्त्यावर दुकानदारांनी केलेल्या अनधिकृत टपऱ्या, फळफळावळ टेबल्स, लोखंडी शेड्स, जाहिरातीचे बोर्ड यावर तोडफोडीची कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले. काही नागरिकांनी तोंडी वाद घालत कारवाईला विरोध दर्शवला. काही ठिकाणी पोलिसांसमोर बाचाबाचीही झाली. मात्र पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात ही कारवाई पूर्ण करण्यात आली.
सदर अतिक्रमणामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच महिलांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अरुंद रस्ते, ट्राफिक जाम, वाहतूक कोंडी यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. विशेषतः संध्याकाळच्या वेळी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत चालला होता.
हडपसर, हांडेवाडीसारख्या भागांमध्ये वाढती अतिक्रमणाची प्रवृत्ती आणि त्यातून उद्भवणारी गुन्हेगारी ही आता चिंतेचा विषय बनली आहे. रात्रीच्या वेळी अंधारात असलेल्या टपऱ्या आणि अस्थायी संरचना हे गुन्हेगारीला खतपाणी घालणारे केंद्रबिंदू ठरत आहेत. यामुळे महिलांची सुरक्षितता आणि नागरिकांचे रोजचे जीवन धोक्यात आले आहे.
अतिक्रमण पुन्हा केल्यास कठोर कारवाई
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने स्पष्ट केले की, सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. पुन्हा अतिक्रमण आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला आहे.