


हिवाळा आपला जम बसवतो आहे, गार वारा आणि गुरफटून बसावेसे वाटायला लावणारी संध्याकाळ नेहमीची आव्हाने घेऊन आली आहे- रुक्ष, फिकट आणि निस्तेज त्वचा. दिवसभर चाललेले शूटिंग, भरपूर मेकअप आणि इनडोर व आउटडोर शूटिंगचे सारखे बदलणारे तापमान यामुळे टेलिव्हिजनच्या कलाकारांसाठी त्वचेची निगा विशेष महत्त्वाची ठरते. आपल्या निरोगी, कॅमेऱ्यासाठी तत्पर, तजेलदार त्वचेवर त्यांची सगळी भिस्त असते. सोनी सबवरील लोकप्रिय कलाकार दीक्षा जोशी, अक्षया हिंदळकर, श्रेनु परीख आणि रजत वर्मा सांगत आहेत, संपूर्ण हिवाळ्यात आपल्या त्वचेची निगा राखण्यासाठी आणि त्वचा सतत तजेलदार ठेवण्यासाठी ते कोणती पथ्ये पाळतात, त्यांच्या सवयी काय आहेत आणि हिवाळ्यात त्यांचे स्किन-केअर रूटीन कसे असते.
‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत दीप्तीची भूमिका करणारी दीक्षा जोशी म्हणते, “जेव्हा तुम्ही दिवसभर शूटिंग करता, तेव्हा तो थकवा आणि हवामानाचा मारा सर्वप्रथम तुमच्या त्वचेवर दिसतो. थंडीमध्ये मी या बाबतीत घाई न करता एक छोटासा विधी करावा या निष्ठेने माझ्या त्वचेची काळजी घेते. सौम्य क्लीन्झरने मी सुरुवात करते त्यावर हायड्रेटिंग सीरमचा एक थर लावते आणि मग चांगले मॉइस्चराइझर लावते, ज्यामुळे मेकअप लावल्यानंतर मला त्वचा घट्ट वाटत नाही. माझ्या व्हॅनिटीमध्ये नेहमी मी एक फेश्यल मिस्ट आणि लिप बाम ठेवतेच, कारण या ऋतूमध्ये स्टुडिओचे दिवे आणि एअर कंडिशनिंग यामुळे त्वचा खूप कोरडी पडते. मला सुट्टी असते, तेव्हा मध आणि दह्याचा एक घरी बनवलेला मास्क लावायला मला आवडते. माझ्या त्वचेला आराम देण्याची आणि तिचे लाड पुरवण्याची माझी ही पद्धत आहे.”
‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत राशीची भूमिका करणारी अक्षया हिंदळकर म्हणते, “लोकांना वाटते की स्किनकेअर म्हणजे फॅन्सी उत्पादने, पण माझ्यासाठी हिवाळ्यातील स्किनकेअरची सुरुवात शिस्तीपासून होते. दिवसभर मी आवर्जून गरम पाणी पिते, आहारात मोसमी फळे घेते आणि शूटिंग संपताच आधी मेकअप दूर करते- कितीही उशीर झालेला असला तरी. थंडी वाढते तेव्हा मी क्रीम-बेझ्ड क्लीन्झर आणि जरा घट्ट असे मॉइस्चराइझर वापरते, नाहीतर माझी त्वचा तडतडते. मी बहुधा इनडोर शूटिंग करत असले, तरी मी सनस्क्रीन अचूक लावते. कारण आपल्याला वाटतो त्यापेक्षाही जास्त प्रकाश आणि ऊन यांचा त्वचेवर खराब परिणाम होत असतो. थंडीत माझी एक आवडती सवय म्हणजे रात्रीच्या वेळी फेश्यल ऑइलचे काही थेंब बोटावर घेऊन चेहऱ्यावर मसाज करणे. याने दिवसभराचा थकवा उतरतो आणि सकाळी उठल्यावर माझी त्वचा मुलायम आणि शांत असते.”
‘गाथा शिव परिवार की – गणेश कार्तिकेय’ मालिकेत पार्वतीची भूमिका करणारी श्रेनु परीख म्हणते, “देवीची भूमिका करायची म्हणजे तासन् तास भरजरी पोशाख परिधान करून आणि मेकअप लावून बसावे लागते. त्यामुळे थंडीत स्किन-केअरला माझ्यासाठी पर्यायच नाही. शूटिंगच्या आधी मी हायड्रेटिंग टोनर आणि बॅरियर स्ट्रेन्दनिंग मॉइस्चराइझर लावून त्वचेस तयार करते. ज्यामुळे ती मेकअप लावल्यावर चांगली राहते, त्यावर धब्बे दिसत नाहीत. पॅक अप झाल्यानंतर मी डबल क्लीन्झिंग रूटीनचे पालन करते आणि मेकअपचा आणि प्रदूषणाचा कणन् कण त्वचेवरून दूर होईल याची खात्री करते. माझा पारंपरिक उपायांवर विश्वास आहे. वीकएंडला मी घरी बनवलेले उटणे आणि बेसन लावते, त्यात आणखी काही त्वचेस उपायकारक घटक घालते. यामुळे प्रखर प्रकाशामुळे निस्तेज झालेल्या त्वचेची नैसर्गिक चमक परत येते. माझ्यासाठी हिवाळा म्हणजे गती थोडी कमी करायची, त्वचेचे सांगणे ऐकायचे आणि त्वचेला निकोप, निरोगी ठेवण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी नियमितपणे करायच्या.”