सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांना अपात्र ठरवल्यास उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतील, असा दावा ज्येष्ठ घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी केला आहे. या संदर्भात उल्हास बापट म्हणाले की, कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात 16 आमदार बाहेर गेले, असा उल्लेख केला आहे.
त्यामुळे दोन महिन्यांतच सर्वोच्च न्यायालयाने निकाल द्यायला हवा होता. कारण दहाव्या सुचीनुसार 16 आमदार अपात्र होतात, पण सर्वोच्च न्यायालय अपत्रातेचा निर्णय घेणार नाही. ते विधासनभा अध्यक्षांकडे पाठवतील आणि विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बंधनकारक असणार आहे.
सत्ता संघर्षाचे प्रकरण अध्यक्षांकडे सोपवल्यानंतर त्यांना निर्णय घेण्यासाठी वेळ दिली जाईल. या प्रकरणातील कायद्यानुसार एकनाथ शिंदे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल आणि हे सरकार पडेल. त्यामुळे उद्धव ठाकेर पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, असेही उल्हास बापट म्हणाले.
राज्यघटनेतील सेपरेशन ऑफ पॉवरनुसार विधिमंडळ, न्यायव्यवस्था आणि अध्यक्ष यांना वेगवेगळे अधिकार दिलेले आहेत. राज्यघटनेने आमदारांना अपात्र ठरविण्याचे अधिकार अध्यक्षांना दिले आहेत आणि त्यात सर्वोच्च न्यायालय काहीच निर्णय घेऊ शकत नाही.
दोन तृतीयांशपेक्षा जास्त लोक बाहेर पडल्यास ते इतर पक्षांमध्ये विलीन झाले तर ते वाचू शकतात. यासाठी दोन तृतीयांश लोक एकाचवेळी बाहेर जाणे गरजेचे असते आणि सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात तेच सांगितले की, 16 आमदार बाहेर गेले आहेत ते अपात्र आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यास तो अध्यक्षांना बंधनकारक राहणार आहे. यात राहुल नार्वेकरही काही करू शकणार नाहीत, असेही बापट यांनी स्पष्ट केले.