18वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज: देशातील पाच शहरांमध्ये मिळणार अविस्मरणीय अनुभव

Photo of author

By Sandhya

18th Mumbai International Film Festival All Set To Enthrall Audiences: Unforgettable Experiences Across Five Cities Across The Country

‘मिफ’च्या माध्यमातून भारतीय निर्मात्यांना जागतिक कल्पनाशक्तीचा अनुभव घेण्याची पर्वणी- माहिती व प्रसारण सचिव संजय जाजू

माहिती, प्रेरणा आणि मनोरंजनाची शक्ती असलेला माहितीपट हा एक प्रचंड मोठा उद्योग- संजय जाजू

लघुपट, माहितीपट आणि ॲनिमेशन चित्रपटांची पर्वणी असलेला 18वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ) उद्याच्या भव्य उद्घाटन सोहळ्यासाठी सज्ज झाला आहे. प्रेक्षक आणि चित्रपट उद्योग व्यावसायिकांना मोहिनी घालणारा हा महोत्सव उद्यापासून सुरु होत आहे.

प्रेक्षकांना समृद्ध अनुभवाची झलक सादर करताना आणि महोत्सवातील चित्रपटांच्या खजिन्याचे अनावरण करताना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू म्हणाले की, अशा महोत्सवांचे आयोजन करण्याचा संपूर्ण उद्देश केवळ सिनेमाला प्रोत्साहन देणे नसून, स्थानिक आणि सामाजिक-आर्थिक समस्यांवर चिंतन करणे आणि धोरण निर्मात्यांना उपायांसाठी मार्गदर्शन करणे हा आहे. ते आज मुंबईत 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पूर्वावलोकनासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी प्रितुल कुमार, व्यवस्थापकीय संचालक, NFDC आणि स्मिता वत्स शर्मा, अतिरिक्त महासंचालक, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, वेस्टर्न रिजन आणि सीईओ, CBFC आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉक्युमेंटरी अर्थात माहितीपट आणि लघुपट यांच्या वाढत्या बाजारपेठेकडे लक्ष वेधत संजय जाजू म्हणाले की, जागतिक माहितीपट आणि टीव्ही शो बाजारपेठ 2028 पर्यंत 16 अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज असून या माध्यमाची माहिती, प्रेरणा आणि मनोरंजन करण्याची ताकद यातून दिसून येते. “माहितीपटांव्यतिरिक्त आमच्याकडे खूप गाजणारे आणि गतिमान असे VFX चे क्षेत्र आहे ज्यामध्ये ॲनिमेशन विभागाचाही समावेश होतो. हा एक मोठा उद्योग आहे ज्यामध्ये आपल्या देशात प्रचंड आर्थिक आणि रोजगार देण्याची क्षमता आहे. हे विभाग यावर्षी MIFF चा भाग आहेत, याबाबत आम्ही आनंदी आहोत.” असे ते पुढे म्हणाले.

ॲनिमेशन आणि व्हीएफएक्स उद्योगात आपल्या देशाने केलेल्या प्रगतीवर प्रकाश टाकताना सचिव पुढे म्हणाले की छोटा भीम आणि चाचा चौधरी यांसारखी भारतीय व्हीएफएक्स पात्रे जगप्रसिद्ध झाली आहेत आणि त्यांनी हे सिद्ध केले आहे की भारतीय कथांमध्ये सार्वत्रिकपणे प्रतिध्वनी करण्याची ताकद आहे. “संपूर्ण उद्दिष्ट आपल्या देशात ॲनिमेशन क्षेत्रात बौद्धिक गुणधर्म निर्माण करणे हा आहे जो दूर आणि पलीकडे गेला पाहिजे. आपल्या अनेक निर्मात्यांना जगाच्या कल्पनांना वेधून घेणाऱ्या अशा कल्पना मांडण्याची ही एक संधी आहे”, असे ते म्हणाले.
MIFF महोत्सवाबाबत अधिक माहिती देताना संजय जाजू यांनी सांगितले की पुढील आठवड्यात MIFF मध्ये 59 देशांतील 61 भाषांमधील 314 चित्रपट, 8 जागतिक प्रीमियर, 5 आंतरराष्ट्रीय प्रीमियर, 18 आशिया प्रीमियर आणि 21 भारतीय प्रीमियर होणार आहेत. 60 देश त्यांच्या चित्रपट आणि इतर प्रकारच्या कार्यक्रमांतून सहभागी होत आहेत. श्रीलंका सरकार उद्घाटन समारंभात त्यांचा सांस्कृतिक वारसा समोर आणणारी कामगिरी सादर करत आहे, तर अर्जेंटिना सरकार समारोप समारंभात त्यांच्या देशाच्या कलागुणांचे प्रदर्शन करत आहे. MIFF फक्त भारतापुरता नसून हा महोत्सव जगाबद्दल आहे. हा महोत्सव जगभरातील चित्रपट निर्मात्यांना संधी देतो, असे त्यांनी म्हटले.

मिफ महोत्सवातील काही अभिनव उपक्रमांची माहिती देताना ते म्हणाले की, यंदाचा महोत्सव पहिला-वहिला डॉक फिल्म बझार सादर करत आहे, जी माहितीपट, ॲनिमेशन आणि लघुपटांसाठी समर्पित बाजारपेठ असेल. यामुळे या प्रभावी माध्यमांमधील समन्वय आणि विकासाला चालना मिळेल. यंदा प्रथमच, मिफ (MIFF) महोत्सवाने डॅनिएला वोल्कर दिग्दर्शित “द कमांडंट्स शॅडो” या मिडफेस्ट चित्रपटाची निवड केली आहे, ज्याने महोत्सवामधील प्रदर्शनाला नवा आयाम मिळणार असून, सर्वसमावेशकतेला चालना मिळेल, असे ते म्हणाले. स्वयम (SVAYAM) या स्वयंसेवी संस्थेच्या भागीदारीने मिफ महोत्सवाची सर्व आयोजन स्थळे प्रत्येकासाठी सहज प्रवेश करता येण्याजोगी बनवली जातील असे ते म्हणाले.

त्याचबरोबर यंदा प्रथमच मिफ महोत्सवातील स्क्रीनिंग (चित्रपट प्रदर्शन) आणि रेड-कार्पेट सोहळा मुंबई, कोलकाता, चेन्नई, पुणे आणि दिल्ली या पाच शहरांमध्ये एकाच वेळी आयोजित केला जाईल. त्यामुळे संपूर्ण भारतातील सिने रसिकांना एकाच वेळी जागतिक दर्जाच्या सिनेमाची जादू अनुभवता येईल. जगभरातील सृजनशील चित्रपट निर्मात्यांच्या प्रतिभेचे प्रदर्शन करणे आणि माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन चित्रपटांच्या व्यापक प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचणे, हे या विस्ताराचे उद्दिष्ट असल्याचे संजय जाजू म्हणाले.

भविष्यातील चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मंत्रालयाने केलेल्या प्रयत्नांची माहिती देताना ते म्हणाले की, यावर्षी, FTII, SRFTI आणि IIMC यासारख्या प्रमुख चित्रपट प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी प्रवास आणि आदरातिथ्य सेवा प्रायोजित करून महोत्सवाने एक महत्वाचे पाऊल पुढे टाकले असून, यामधून त्यांना या महोत्सवात सहभागी होण्याची, या क्षेत्रातील तज्ञांकडून मार्गदर्शन मिळवण्याची आणि आपले नेटवर्क वाढवण्याची संधी मिळेल.

उद्‌घाटन समारंभात FTII च्या विद्यार्थ्यांचा लघुपट “सनफ्लॉवर्स वॉज फर्स्ट वन टू नो” प्रदर्शित केला जाईल, या लघुपटाला यावर्षीच्या 77 व्या कान चित्रपट महोत्सवात गौरवण्यात आले होते, अशी माहिती संजय जाजू यांनी यावेळी दिली. तसेच भारताच्या सॉफ्ट पॉवरमध्ये वाढ होत असल्याचे यामधून दिसून येते, असे त्यांनी सांगितले.

विविध भाषा आणि विविध प्रकारचे निर्माते असलेला भारत एक विशाल आणि वैविध्यपूर्ण देश आहे. सोशल मीडियाच्या जमान्यात असे बरेच निर्माते आहेत ज्यांनी सिनेमाचे शिक्षण घेतलेले नाही, परंतु त्यांच्याकडे एक प्रचंड मोठा प्रेक्षकवर्ग आहे, त्यांनी तयार केलेल्या सामग्री प्रचंड लोकप्रिय असते. अशा स्वतंत्र चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक सरकारी योजना आहेत. त्यांना महोत्सवाच्या माध्यमातून संधी मिळेल,” असेही त्यांनी म्हटले.

Leave a Comment