२० व्या वर्षी २२ गुन्हे! येरवड्यात दहशत माजवणाऱ्या तरुणाला पोलिसांचा चाप

Photo of author

By Sandhya

22 crimes at the age of 20! Police crackdown on youth who terrorized Yerwada

पुणे : शहरात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वाहन तोडफोडीच्या मालिकेमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती अखेर दूर झाली आहे. अवघ्या २० व्या वर्षी तब्बल २२ गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सराईत आरोपीला अटक करत लक्ष्मी नगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे. येरवडा परिसरातील नागरिकांनी या कारवाईचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख सुलतान रिजवान शेख (वय २०) अशी आहे. शहरातील विविध भागांत उभ्या असलेल्या वाहनांची काच फोडणे, वाहनांचे नुकसान करणे अशा प्रकारच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. तांत्रिक तपास, दृश्यचित्रफितींची पडताळणी आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याचा तब्बल २२ वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
सदर २२ गुन्हे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंद आहेत. त्यामध्ये येरवडा पोलीस स्टेशन, लष्कर पोलीस स्टेशन, कोंढवा पोलीस स्टेशन, खडक पोलीस स्टेशन, कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन, समर्थ पोलीस स्टेशन, फरासखाना पोलीस स्टेशन आणि बंडगार्डन पोलीस स्टेशन या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे.
नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास दृढ व्हावा आणि समाजविघातक प्रवृत्तीविरुद्ध कठोर भूमिका स्पष्ट व्हावी यासाठी पोलिसांनी आरोपीला संबंधित गुन्हे घडलेल्या ठिकाणी नेऊन जाहीर धिंड काढली. या कारवाईमुळे परिसरात कायद्याचा धाक निर्माण झाला असून महिलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी दिलासा व्यक्त केला आहे.
या संदर्भात बोलताना पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी सांगितले की, आरोपी हा लहानपणापासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून सुमारे १४ ते १५ वर्षांच्या वयापासून तो गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय आहे. तो अमली पदार्थांच्या आहारी गेला असून नशा केल्यानंतर नियंत्रण गमावून थेट मारहाण व तोडफोड करत असे. आतापर्यंतचे बहुतांश गुन्हे त्याने नशेच्या अवस्थेत केले असल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे.
“अशा प्रकारच्या गुन्हेगारांविरुद्ध पुढेही शंभर टक्के कारवाई सुरू राहील. महिला आणि लहान मुलांना रस्त्यावर निर्धास्तपणे फिरता आले पाहिजे. राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला दिलेले अधिकार सुरक्षित राहिले पाहिजेत. गुन्हेगारांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होते, लोक संध्याकाळी बाहेर पडण्यास घाबरतात आणि तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी निर्भयपणे पुढे येऊन तक्रार द्यावी,” असे आवाहन त्यांनी केले.
सध्या आरोपीची कसून चौकशी सुरू असून त्याच्या मागे कोणते मोठे जाळे आहे का, तसेच त्याचे इतर साथीदार कोण आहेत, याचा तपास करण्यात येत आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या ठोस कारवाया भविष्यातही सुरू राहतील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे येरवडा परिसरात पुन्हा एकदा कायद्याचा धाक निर्माण झाला असून नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page