72 तासांमध्ये मान्सून मुंबई, पुण्यात दाखल होणार असल्याचा अंदाज

Photo of author

By Sandhya

मान्सून

पुढील 72 तासांमध्ये मान्सून मुंबई, पुण्यात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने सोमवारी वर्तविला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्यामुळे मान्सून आणखी सक्रिय होण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

यामुळे रत्नागिरीमध्ये मान्सूनचा थांबलेला प्रवास आता पुढे सरकून पुढील तीन दिवसांमध्ये मुंबईत आगमन होऊ शकते, असे हवामान तज्ज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे या वातावरणामुळे कोकणात 21 ते 23 जूनपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज असून, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस राहील. विदर्भात मात्र अत्यंत हलका पाऊस राहून उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे.

येत्या 72 तासांत मान्सून हा मुंबई, पुणे, महाराष्ट्राचा दक्षिण मध्य भाग, कोकण, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राचा इतर भाग व्यापण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून मान्सून अधिक सक्रिय होईल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मराठवाडा व विदर्भात शुक्रवारनंतर पावसाला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे 25 जूननंतर सर्वत्र चांगला पाऊस पडू शकतो, असे हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी म्हटले आहे.

यंदा मान्सूनच्या आगमनाच्या सुरुवातीलाच बिपरजॉय चक्रीवादळाने रौद्ररुप दाखवले. वादळामुळे मान्सूनही संत गतीने पुढे सरकत आहे. 11 जून रोजी मान्सून कोकणात दाखल झाला, यानंतर 15 जूनपर्यंत तो राज्यभर हजेरी लावणार होता. पण चक्रीवादळामुळे मान्सून कोकणातून पुढे सरकलाच नाही.

Leave a Comment

You cannot copy content of this page