लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षेप्रमाणे यश मिळवता आले नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपाला अनेक ठिकाणी पराभव पत्करावा लागला. ४०० पारचा नारा दिला असला तरी प्रत्यक्षात भाजपाचे २४० खासदार निवडून आले.
राज्यात दोन आकडी संख्याही भाजपाला गाठता आली नाही. यातच पराभवाची जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी इच्छा व्यक्त केली.
यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका करताना, आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १८५ जागा मिळतील, असे भाकित केले आहे.
राज्यात महाविकास आघाडीने महायुतीला तगडे आव्हान देत जास्त जागा मिळवल्या. यानंतर आता संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले आहेत. संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र स्वाभिमानी आहे.
देवेंद्र फडणवीसांनी बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेऊन महाराष्ट्र संपवण्याचा प्रयत्न केला. राजकीय विरोधकांवर सूडाच्या कारवाया करण्यात ते आघाडीवर होते. अशा प्रकारची व्यक्ती महाराष्ट्राच्या राजकारणात असावी असे आम्हाला वाटत नाही.
लोकांचा जेवढा राग मोदी-शाहांवर नाही, तेवढा राग महाराष्ट्रात फडणवीसांवर आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवली. देवेंद्र फडणवीस हे पेशवाईतल्या आनंदीबाईंप्रमाणे वागत आहेत, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.
आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १८५ जागा मिळतील काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत त्यात शिवसेनेचेही योगदान आहे. आम्ही त्याबाबत वेळ आली चर्चा करु. महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे.
विधानसभेला याहून मोठे यश मिळेल. आमच्या जागा चोरण्याचा, विजय चोरण्याचा प्रयत्न झाला. अमोल कीर्तिकरांच्या जागेसाठी जो प्रयत्न झाला, ते अनेक ठिकाणी झाले. विधानसभा निवडणुकीत ते होणार नाही. आम्ही १८० ते १८५ जागा सहज निवडून येऊ, असा मोठा दावा संजय राऊतांनी केला आहे.
दरम्यान, एनडीएची दारे चंद्राबाबू नायडूंसाठी बंद आहेत हे अमित शाह यांनी जाहीर केले होते. २०१९ मध्ये चंद्राबाबू म्हणाले होते की, नरेंद्र मोदी लोकशाहीचा गळा घोटत आहेत. आता त्याच चंद्राबाबूंना यांनी बरोबर घेतले आहे.
त्यामुळे हे सरकार आले तर ते टिकणार नाही. अनैतिक सरकार स्थापन झाल्यानंतर ते पाडून येण्यात मजा आहे ते आत्ता बनवण्यात नाही, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.