नाना पटोले : “राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार सत्तेबाहेर काढणे हेच उद्दिष्ट, विधानसभेसाठी…”

Photo of author

By Sandhya

नाना पटोले

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असले तरी यापेक्षाही अधिक यश मिळू शकले असते. आता विधानसभा निवडणुकीत आघाडी म्हणून लढताना मेरीटनुसार जागा वाटप झाले तर चांगला निकाल लागू शकतो.

काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभा निवडणूक लढवणार आहे. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक बांधणीवर भर देणार असून राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार सत्तेबाहेर काढणे हाच उद्देश आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अधक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने राज्यातील सर्व ४८ जागांवर संघटनात्मक बांधणी केली होती, त्याचा फायदा काँग्रेस पक्षाबरोबरच महाविकास आघाडीला झाला. आताही विधान सभेसाठी २८८ जागांवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

एकत्रित लढायचे असेल तरी संघटनात्मक तयारी करायला लागते. काँग्रेसने सर्व जागांवर तयारी केली तर त्याचा फायदा मित्रपक्षांनाही होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावेळी मेरिटचा विचार केला असता तर आणखी चांगले परिणाम दिसले असते. राज्यातील भाजपा सरकारला सत्तेतून बाहेर काढणे हेच महत्त्वाचे आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.

या सर्व मुद्द्यांवर अधिवेशनात सरकारला जाब विचारु महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या नावाने योजना करुन कोट्यवधी रुपये लुटले आहेत. डीबीटी योजनेतून टेंडर न काढता मुख्यमंत्र्यांनी खरेदी करुन लूट केली. सरकारकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत पण त्यांच्या नावावर लुट मात्र सुरु आहे.

बांधकाम विभागाच्या जागा तारण ठेवून त्यावर कर्ज काढले आहे. राज्याच्या जनतेला कर्जात डूबवण्याचे काम सुरु आहे, या सर्व मुद्द्यांवर अधिवेशनात सरकारला जाब विचारु, असे नाना पटोले म्हणाले. भाजपाला ओबीसींची मते हवी आहेत नेते मात्र नको छगन भुजबळांना त्रास होत आहे हे स्पष्ट दिसत आहे, भाजपा हा ओबीसीची नेतृत्वाची नेहमीच अवहेलना करत आला आहे.

ओबीसी नेता भाजपाच्या सानिध्यात असेल तर त्याला टार्गेट केले जाणारच. गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत काय घडले हे सर्वांनी पाहिले आहे. याच छगन भुजबळांना जेलमध्ये टाकले होते, त्यावेळी ते डाकू होते आता ते संन्यासी झाले आहेत. भाजपाला ओबीसींची मते हवी आहेत नेते मात्र नको, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

दरम्यान, NEET परीक्षेत केवळ ग्रेस मार्क्सचा मुद्दा नव्हता तर या परीक्षेत घोटाळा झालेला आहे, पेपर लिक झाला आहे हे गंभीर आहे. NEET परीक्षेला बसलेल्या देशभरातील २४ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याचा हा प्रश्न आहे. परीक्षा केंद्र व कोचिंग क्लासेसवाल्यांची अभद्र युती झालेली आहे

आणि त्यातून हा घोटाळा झालेला आहे. केंद्रातील भाजपा सरकार NTA च्या खांद्यावर बंदुक ठेवून आपली जबाबदारी झटकू पहात आहे. या घोटाळ्याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment