शरद पवार : ‘विधानसभेला मोदी जेवढ्या जास्त सभा घेतील तेवढा ‘मविआ’ला फायदा होईल’…

Photo of author

By Sandhya

शरद पवार

लोकसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळाले. तर महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. दरम्यान, आता राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

आज मुंबईत महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. शरद पवार यांनी लोसकभा निवडणुकीतील राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांचा आकडा सांगत स्ट्राइक रेट काढला.

मुंबईत महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेते शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, संजय राऊत आदी नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, “पंतप्रधान मोदींच्या सभा आणि रोड शो जिथे झाल्या तिथे आमच्या उमेदवारांना जनतेने मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला.

विधानसभेच्या निवडणुकीवेळी पंतप्रधानांच्या जेवढ्या जास्त जागांवर सभा होतील तेवढी आमची स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल होईल. त्यामुळे मोदींना धन्यवाद देणे हे माझं कर्तव्य आहे, असा टोलाही शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

आज शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील विविध विषयावर भाष्य केले. अजित पवारांना सोबत घेऊन भाजपने आपली किंमत कमी करुन घेतली या प्रश्नावर बोलताना शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

“त्यांना नेमकं एवढंच सांगायचे आहे की, महाराष्ट्राच्या जनतेने आमचा पराभव केला. त्या सर्वांची कारणे अनेक आहेत. पण ते अजूनही बोलू इच्छित नाहीत. त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला. आम्ही कशाला काय सांगू,” अशी सूचक प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. यावेळी खासदार शरद पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवरही भाष्य केले. आता अजित पवार यांना सोबत घेण्याचा प्रश्नच येत नाही, असंही पवार म्हणाले.

Leave a Comment