शहरात अपघाताचे सत्र अद्याप सुरूच असून दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर धानोरी परिसरात रविवारी (ता. १६) मध्यरात्री भरधाव मोटारीने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षातील चौघे जखमी झाले आहेत.
धानोरीतील पोरवाल रस्त्यावर रविवारी (ता.१६) रात्री साडेबाराच्या सुमारास रिक्षाचालक नातेवाइकांसह आइस्क्रीम खाण्यासाठी आला होता. त्याने रिक्षा रस्त्याच्या कडेला लावली होती.
रिक्षाचालक, दोन महिला, लहान मुलगा रिक्षात होते. त्यावेळी भरधाव मोटारीने पाठीमागून रिक्षाला धडक दिली. अपघातात रिक्षातील चौघे जखमी झाली. अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
मोटार चालक तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अहवालानंतर मोटार चालकाने मद्यप्राशन केले का नाही, याबाबतची माहिती मिळेल. मात्र, प्रत्यक्षदर्शीनी मोटार चालकाने मद्यपान केल्याची माहिती दिली.
नगर रस्त्यावरील आव्हाळवाडी परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या शाळकरी मुलाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. मानस अभिजित पवार (वय १२, रा. वृंदावन सोसायटी, आव्हाळवाडी, नगर रस्ता) असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील प्रवीण पवार (वय ३९) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रविवारी (ता.१६) मानस दुपारी साडेबाराच्या सुमारास नगर रस्त्यावरील आव्हाळवाडी परिसरातून निघाला होता. त्यावेळी रस्ता ओलांडणाऱ्या मानसला दुचाकीने धडक दिली. मानस रस्त्यात पडला. त्यावेळी पाठीमागून आलेल्या मोटारीच्या चाकाखाली सापडून त्याचा मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक वैजनाथ केदार या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
पीएमपीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू भरधाव पीएमपीच्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना वारजे भागात घडली. वसंत लक्ष्मण तिकोने (वय ६२, रा. केळेवाडी, पौडफाटा) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.
याबाबत कैलास तिकोने (वय ५५ रा. मुठा, ता. मुळशी) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार तिकोने रविवारी (ता.१६) सकाळी नऊच्या सुमारास वारजे पुलाजवळून जात होते. तेव्हा पीएमपीने त्यांच्या बसला धडक दिली.