राज ठाकरे : जातींमध्ये विष कालविणाऱ्यांना दूर करा; जातीपातीच्या राजकारणाचा पुढच्या पिढ्यांवर परिणाम…

Photo of author

By Sandhya

राज ठाकरे

‘‘समाजामध्ये जातीपातीचे विष कालवणाऱ्यांना महाराष्ट्रातून दूर करावे. कारण यातून काहींना मते हाती लागतील, परंतु राज्यात खून -खराबे सुरु होऊ शकतो,’’ असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी दिला.

आगामी विधानसभा निवडणुकीबाबत मनसेची आज बैठक झाली. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर काही जबाबदाऱ्या सोपवून त्यांना विधानसभांचे अहवाल तयार करण्यास सांगण्यात आले आहे. पक्षांतर्गत विषयांवरही चर्चा करण्यात आली.

‘‘आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने यावेळी चर्चा करण्यात आली. पक्षाच्या नेत्यांना कामे नेमून देण्यात आली आहेत. त्यातील काहींना विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने अहवाल तयार करण्यास सांगण्यात आले आहे,’’ असे ठाकरे यांनी सांगितले.

‘‘जातीपातीच्या राजकारणाने समाजात काहीही होत नाही. हे सगळे पुढारी जातीपातीत द्वेष पसरवून फक्त मते घेतात. जनता त्यांना भोळसटपणे मत देते. पण याचा परिणाम पुढच्या पिढ्यांवर होणार आहे. हे जातीपातीचे राजकारण शाळा, महाविद्यालयांपर्यंत जाणार आहे. हे विष महाराष्ट्रात यापूर्वी कधीही नव्हते.

जातीपातीचे विष कालवणाऱ्यांना महाराष्ट्राने दूर ठेवले पाहिजे. कितीही आवडता नेता किंवा आवडता पक्ष असला तरीसुद्धा असले विष कालवणार असतील तर पुढच्या पिढ्यांचे काय होणार? महाराष्ट्राचे काय होणार?,’ असा सवाल ठाकरे यांनी केला.

Leave a Comment