मद्यधुंद अल्पवयीन मुलाने भरधाव पोर्श कारने चालवत रविवार, १९ मे रोजी पुण्यातील दोन आयटी इंजिनिअरला चिरडले होते. संशयित आरोपीच्या सुटकेसाठी त्याच्या नातेवाईकाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मागील सुनावणीवेळी दोन्ही बाजूंच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने मंगळवार, २५ जूनपर्यंत आपला निर्णय राखून ठेवला होता.
Bombay High Court grants bail to the juvenile accused in the Pune car accident case. pic.twitter.com/W6MRyW1OBJ
— ANI (@ANI) June 25, 2024
मागील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, या अपघातात ठार झालेल्या तरुण आणि तरुणीच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. तसेच दारूच्या नशेत हा अपघात घडवणारा अल्पवयीन युवकही मानसिक धक्क्यात आहे.
या घटनेचा परिणाम त्याच्या मनावर झाला असेल, असे स्पष्ट करत न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर आपला निर्णय राखून ठेवत २५ जून रोजी पुढील सुनावणी होईल, असे स्पष्ट केले होते.
पुण्यातील कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीने तो दारू पीत असल्याचे मान्य केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलगा दारु पित असल्याचे त्याच्या वडिलांना माहित हाेते. तरीही त्यांनी त्याला अलिशान पोर्शे कार चालविण्यास दिली असल्याचे पाेलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
पोर्शे कार अपघातातील आरोपीचे वडील, ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह हॉटेल मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेलचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर अशा चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. विशाल अग्रवाल याला २१ मे रोजी अटकही करण्यात आली होती.