त्रिकुटांच्या लुटारू सरकारने भ्रष्टाचाऱ्याच्या सर्व सीमा पार केल्या आहेत. राज्यातील कमिशनखोरी ३० टक्यांच्या पुढे गेली आहे. कमिशनखोर सरकार म्हणून सरकारमधील प्रत्येकाची ओळख निर्माण झाली आहे.
राज्याच्या प्रमुखांपासून सगळ्या मंत्र्यांनी दलालांची फौज उभी केली आहे. प्रत्येक माळ्यावर दलालांना स्वतंत्र कक्ष दिले आहेत, तोडपाणी त्या कक्षातच सुरू असते, असा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
सरकारच्या चहापाणावर विरोधकांचा बहिष्कार; बैठकीत निर्णय
गुरुवारपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज (दि. २६) बैठक पार पडली. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी वडेट्टीवार म्हणाले की, १४ व्या विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन असून या सरकारने राज्याला खड्यात घालण्याच काम केले.
२ वर्षापूर्वी भाजपने लोकशाहीचा गळा आवळला आणि बेकायदेशीरपणे सरकार स्थापन केले. हुकुमशहा बनण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनतेने जागा दाखवली. जनाधार नसलेल सरकार राज्यात असून जनतेने लोकसभेत भाजपला सणसणीत उत्तर दिले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारची फक्त जुमलेबाजी सुरू आहे. शेतकऱ्यांना फसवण्याचं काम सरकारने केलं आहे. जीएसटी कुठे लावावा, हे सरकारला कळत नाही. शेतकऱ्यांची औजारे आणि खतांवर जीएसटी लावला आहे.
शेतकऱ्यांना उध्वस्त करणाऱ्या सरकारने शेतमालाला हमीभाव दिलेला नाही. गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला निर्यात परवानगी आहे, मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना का नाही? केंद्र सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांविरोधात आहे.
खते विक्रेत्यांकडून सरकार हप्ते घेतं, बियाणं नसल्याने शेतकरी रांगेत उभे असतात. सरकारने घेतलेले सर्व निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांविरोधात असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.