राज्यात काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला. याबाबत फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहे. याबाबत राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असताना सुषमा अंधारे यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
पत्रकारांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एका ताटात जेवले तरी, आता आम्ही फडणवीस या नावावर फुल्ली मारलेली आहे. योगायोगाने आपल्याकडे लिफ्ट पाच-पन्नास नाही, त्यामुळे एकाच लिफ्टमधून ते गेले. त्यामुळे याचा अर्थ लगेच एकत्र आल्याचा होत नाही, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
जनतेला आश्वासनांचे चॉकलेट देऊ नका एकीकडे लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. तर दुसरीकडे भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ आणि चॉकलेट दिले. यावर सुषमा अंधारे यांनी तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पक्षाने आम्हाला विश्वासघाताचे विषारी घोट पाजले आहेत. हे विश्वासघाताचे विषारी घोट पचवून आम्ही परत उभे राहिलो आहे. माध्यमांच्या समोर जरी चंद्रकांत पाटील यांनी चॉकलेट दिले असले तरी आमची विनंती आहे की जनतेला आश्वासनांचे चॉकलेट देऊ नका.
तुमच्या अशा चॉकलेटने आम्ही तुम्हाला जनतेच्या बाबत प्रश्न विचारणार नाही या भ्रमात राहू नका. मेरा यार मेरा दुश्मन हा चित्रपट पुन्हा एकदा बघून घ्या याचा काहीही परिणाम होणार नाही. कुठली चर्चा झाली नाही, आम्ही कुणासोबत जाणार नाही, असे सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या लिफ्टमधील भेटीवेळी भाजपा नेते प्रवीण दरेकरही उपस्थित होते.
राजकारणात आपण राजकीय शत्रू असतो, कायमस्वरुपी शत्रू नसतो. लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस सोबत आले. त्यावेळी कुणीतरी म्हणाले की तुम्ही दोघ एकत्रित आहात बरे वाटते, त्यावेळी उद्धवजी मला म्हणाले की, याला पहिले बाहेर काढा. त्यावेळी मी म्हणालो की, तुमचे अजून समाधान झाले नाही का? माझी बाहेर जायची तयारी आहे. होताय का एकत्र.
मी म्हणालो, बोलता तसे करा. त्यानंतर आमच्यात थोडासा हास्यविनोद झाला. आम्ही लिफ्टमधून बाहेर आलो. पण, उद्धवजी विरोधी दिशेला गेले. आम्ही सत्तेच्या दिशेला गेलो. म्हणजे त्यांची मानसिकता विरोधी बसायची आहे, सत्तेच्या दिशेला ते आले नाहीत, असे दरेकर यांनी सांगितले.