विधान परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सभात्याग करण्यात आला. दरम्यान, भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर खेळाडूंचं अभिनंदन करण्याऐवजी बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांचे अभिनंदन करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे.
याला आमचा विरोध आहे. मात्र, आम्हाला यासंदर्भात विधान परिषदेत बोलू दिलं जात नाही, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. विधानसभेच्या सभापती पक्षपातीपणे वागत आहेत, अशी टीकाही अंबादास दानवे यांनी केली आहे.
विधान परिषदेत सभात्याग केल्यानंतर माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर खेळाडूंचं अभिनंदन करण्याऐवजी बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांचे अभिनंदन करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे.
खरंतर खेळाडूंचे अभिनंदन व्हायला हवे, खेळाडू मेहनत घेतात आणि भारताचे नाव उंचावतात. मात्र, त्यांचे अभिनंदन सोडून भाजपाच्या नेत्यांचे अभिनंदन करण्यासाठी सांगत आहेत, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला.
भाजपकडून खेळाचं राजकारण केलं जात आहे. जे मैदानावर परीश्रम करतात. त्यांच्यामुळे आज आपण विश्वचषक जिंकलो आहे. त्याचं सोडून आशिष शेलार यांचे अभिनंदन कशाला करायचं? हा खेळाडूंचा आणि भारतीय क्रिकेट संघाचा अपमान आहे.
भाजपला देशाशी काही देणं-घेणं नाही. त्यांच्याकडून केवळ स्वत:च्या नेत्यांचा विचार केला जातो. अशा विषयावर भाजपच्या सदस्यांना बोलू दिले जाते. मात्र, विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू दिलं जात नाही. हा पक्षपातीपणा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सदस्यांनी सभात्याग करण्याचा निर्णय घेतला, असेही अंबादास दानवे यांनी सांगितले.