भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना सोमवारी पक्षातर्फे विधान परिषदेवर उमेदवारी घोषित झाली. यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.
पंकजा मुंडे यांचा मागच्या विधानसभेत पराभव झाल्यापासून त्यांचे पक्षातर्फे पुनर्वसन करा, अशी मागणी समर्थकांच्या माध्यमातून सातत्याने होत होती. पंकजा यांचे राज्यसभा, विधान परिषदेसाठी वेळोवेळी संभाव्य यादीत नाव येत होते.
पण, पाच वर्षांत काही नंबर लागला नाही. लोकसभेच्या निवडणुकीत डॉ. प्रीतम मुंडे यांच्या जागी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला.
यानंतर महाराष्ट्रातील समीकरणे बघता व ओबीसी, मराठा आरक्षण प्रश्न, तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांना पद देणे आवश्यक होते. हे लक्षात घेऊन केंद्रीय पातळीवर चर्चा होऊन पंकजा मुंडेंसह पाच जणांना विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली.
पक्षाकडून उमेदवारी जाहीर होताच भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज चौक, राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक, यशःश्री निवासस्थान, धनंजय मुंडे यांचे जगमित्र कार्यालय याठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, गुलाल उधळत पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.