राज्य शासनाने सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालातून राज्याची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ‘‘या अहवालात दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र हे सहाव्या क्रमांकावर असल्याचे म्हटले आहे.
मात्र केंद्र सरकारच्याच सांख्यिकी विभागाने दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र हे ११ व्या क्रमांकावर असल्याचे नमूद केले आहे. तुमची माहिती खरी असेल तर मोदींचे आकडे चुकीचे आहेत, हे जाहीर करावे.
एकूणच चुकीची माहिती देऊन सरकारने महाराष्ट्राची फसवणूक केली आहे,’’ असा आरोप चव्हाण यांनी केला. विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार सभागृहात उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, ‘‘राज्याची अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक आहे. महागाई दर आणि आताचा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास दर चालू किमतीनुसार ५.५६ टक्के इतका आहे. यातून महागाई निर्देशांक ५.१ हा वजा जाता राज्याचा खरा विकास दर जवळपास शून्य टक्के असल्याचे सांगत अर्थसंकल्पाचे वाभाडे काढले.
या गतीने विकास झाला तर आपली ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था कशी तयार होईल, असा प्रश्न उपस्थित केला. आपली अर्थव्यवस्था ४० लाख कोटींवरून ४२ लाख कोटींवर गेली आहे. या पद्धतीने ती ट्रिलियन डॉलरपर्यंत कधी पोहोचेल, असा सवाल त्यांनी केला.
‘लाडक्या बहिणी’ला महिना ५ हजार द्यावेत अर्थसंकल्पीय चर्चेवर बोलताना सुनील प्रभू म्हणाले, ‘‘दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या वस्तूचे दर गगनाला भिडले आहेत. तेल, डाळ, तांदूळ, चटणी अशा नऊ जीवनावश्यक वस्तूंचे दर २०१४ मध्ये दोन हजार ५०० रुपये इतके होते.
आज २०२४ मध्ये हेच दर चार हजार ३५ रुपये झाले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणीला १५०० रुपये न देता दर महिना पाच हजार रुपये द्यावेत,’’ अशी मागणी केली.