सरकारमधील मंत्र्याच्या वरदहस्ताने डांबराच्या बिलातून शेकडो कोटी रुपये उकळल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत पुरवणी मागणीवरील चर्चेदरम्यान केला.
आर. डी. सामंत कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शासकीय कामांचे कंत्राट घेते. एका मंत्र्यांचे सगेसोयरे या कंपनीमध्ये आहेत. या मंत्र्यांच्या वरदहस्तामुळे या कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी, नॅशनल हायवे इत्यादी विभागांमधील कामे घेऊन घोटाळा केल्याचा आरोप पाटील यांनी केला.
दोन्ही कामांसाठी एकच बिलया कंपनीने केलेल्या काही कामांची उदाहरणे जयंत पाटील यांनी सभागृहात दिली. कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रत्नागिरी येथील रेवस रेड्डी रोडचे रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम केले.
यासाठी वापरलेल्या डांबराच्या बिलाचा नंबर आणि रत्नागिरी एमआयडीसी पाणीपुरवठा योजनेंतर्गत पोहच रस्ता ते जॅकवेलपर्यंत जाणाऱ्या डांबरी रस्त्याचे नूतनीकरण करण्याच्या कामासाठी वापरलेल्या डांबराच्या बिलाचा नंबर एकच आहे.
(बिलाचा नंबर – बीपीसीएल ४५८२१११०४४) म्हणजेच या दोन्ही कामांसाठी एकच डांबर बिल वापरून पैसे काढण्याचे काम झाले आहे. नेवरे भांडारपुळे रस्ता या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केलेल्या रस्ता रुंदीकरण आणि ब्लॅक टॉपिंग कामासाठी वापरलेल्या डांबराचा पावती क्रमांक आणि रत्नागिरी पाणीपुरवठा योजना अंतर्गत हार्चेरी जॅकवेलपर्यंत जाणारा पोहच रस्ता पुनर्डांबरीकरणाच्या कामाच्या डांबराच्या बिलाचा नंबरदेखील सारखाच आहे, असे पाटील म्हणाले.