राज्यात मराठा आणि ओबीसी वाद वाढत चालला आहे. परिस्थिती स्फोटक होत चालली आहे. त्यामुळे झाले गेले सर्व विसरून शरद पवारांनी यातून मार्ग काढावा, अशी भूमिका घेऊन मंत्री छगन भुजबळांनी शरद पवार यांची भेट घेतली होती.
यानंतर आता आरक्षणाच्या प्रश्नावर शरद पवारच मार्ग काढतील, असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. ते येवला दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलत होते.
भुजबळ म्हणाले, राज्यात यापूर्वीही शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात टोकाची टीका होत होती. मात्र, राज्याच्या प्रश्नाबाबत ते एकत्र येऊन मार्ग काढत होते.
आताही शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करतात. परंतु शेती विषयक प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र बसतात. त्याचप्रमाणे आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात देखील शरद पवार मार्ग काढतील याची मला खात्री आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.