मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळावं, अशी मागणी लावून धरत पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आज एक गंभीर आरोप केला आहे.
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना महाराष्ट्रामधून मराठा जात संपवायची आहे, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तसेच जेव्हा टांगा पटली होईल, तेव्हा आमची गरज कळेल, असा इशारा दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थळावरून आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना माध्यमांनी त्यांना अमित शाह यांनी रविवारी पुण्यामधील भाजपाच्या मेळाव्यात केलेल्या भाषणाबाबत प्रतिक्रिया विचारली. तेव्हा मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ते काय लक्ष घालणार? ते मोठे लोक आहेत.
गरीबांकडे लक्ष द्यायला त्यांना कुठे वेळ आहे. जेव्हा टांगे पलटी होतील तेव्हा कळणार आहे. त्यांना केवळ सत्ता स्थापन करेपर्यंत गरीबांची गरज होती. सत्ता स्थापन केल्यावर त्यांनी गरीबांवर लाथ मारलीय. आता मोठे मोठे कावळे ओळखीचे झालेत त्यांच्या त्यांना धरून आहेत ते, अशी टीका जरांगे पाटील यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी हे शिर्डीला आले होते तेव्हा त्यांना आरक्षणाच्या प्रश्नामध्ये लक्ष घाला, असं आवाहन आम्ही केलं होतं. मात्र त्यांनी लक्ष घातलं नाही. लोकांचे मुडदे पाडणारे लोक आहेत ते. त्यांचा केवळ चेहरा माणसाचा आहे. ते आतमधून कपटाने भरलेले आहेत. त्यांचं काही खरं नाही.
ते गरिबाला कधीच मोठं करणार नाहीत. त्यांना देशातील मोठ्या जाती संपवायच्या आहेत. महाराष्ट्रात मराठा मोठी जात आहे. ती त्यांना संपवायची आहे. गुजरातमध्ये पटेल, तसेच यादव, राजपूत, गुर्जर, जाट, मुस्लिम, दलित अशा मोठ्या जाती संपवायच्या आहेत.
ते विचित्र लोक आहेत. मोठ्या जाती संपवायच्या आणि छोट्या जातींना धरून राजकारण करायचं हा त्यांचा पणच आहे. मात्र मोठ्या जाती एकत्र आल्यावर काय होईल, हे त्यांना माहिती नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.