आ. संजय जगताप यांची विधानसभा अध्यक्षांकडे मुख्यमंत्र्यांविरोधात विशेषाधिकारभंग व अवमानाची सुचना….

Photo of author

By Sandhya

संजय जगताप


पुरंदर तालुक्यातील नागरीकांच्या प्रश्नांबाबत सासवड येथे ( दि २४ रोजी ) पुर्व नियोजन करून आयोजित केलेल्या आमसभेच्याच दिवशी मुख्यमंत्री महोदयांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहात पुरंदरच्या प्रश्नांबाबत बैठक आयोजित केली. त्याबाबत मला माहीती मिळाल्यावर मी पत्र पाठवून आणि मुख्यमंत्री महोदयांच्या स्विय सहाय्यकांशी भ्रमणध्वनीव्दारे चर्चा करून याच दिवशी पुरंदर तालुक्यात आमसभा असून मुंबई येथील सदर बैठक रद्द करून पुढे ढकलण्याची विनंती केली असतानाही लोकप्रतिनिधी शिवाय मा मुख्यमंत्र्यांनी दहा मिनिटांची बैठक घेतली. आमसभा असताना त्या मतदारसंघाबाबत इतर कोणत्याही शासकीय बैठकीचे आयोजन करू नये या परंपरेचा जाणीखेडवपुर्वक उल्लंघन केला.

ही बाब संसदीय लोकशाहीला घातक असून जनतेतून निवडूण आलेल्या विधानसभा सदस्यांचा व विधानसभेच्या सार्वभौम सभागृहाचा अवमान करणारी असल्याचे पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना सांगत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात विशेषाधिकारभंग व अवमानानाची सुचना गुरुवारी ( दि २५ रोजी ) समक्ष भेटून पत्र देऊन दिली आहे.

याबाबत आमदार संजय जगताप यांनी शुक्रवारी ( दि २६ ) सासवड येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. याबाबत आमदार संजय जगताप यांनी, एका माजी लोकप्रतिनिधी समवेत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली त्यावरून हे राज्य मुख्यमंत्री चालवत आहेत की अजून कोण असा सवाल आ जगताप यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्र्यांची ही कृती म्हणजे पुरंदरच्या जनतेचा नव्हे तर लोकशाहीचा अपमान केला असून मुख्यमंत्र्यांच्या या दुट्टपी धोरणांबद्दल त्यांनी तिव्र नापसंती व्यक्त केली. मुंबईतील बैठकीतील झालेल्या विषयांबाबत मी अनेकदा विधीमंडळात प्रश्न, तारांकित प्रश्न उपस्थित केले असून शासनाकडून आवश्यकत्या ठिकाणी निधी उपलब्ध केला जात नसल्याचे स्पष्ट करून त्यांनी शासनाच्या या आडवाआडवीच्या आणि निधी वळविण्याच्या धोरणावर तिव्र शब्दात टिका केली.

याप्रसंगी तालुक्यातील पालखी महामार्ग, गुंजवणी योजना, प्रस्तावित विमानतळ, आरोग्य, प्रशासकीय इमारत, पुरंदर उपसा, मराठा आरक्षण, लाडका भाऊ – बहिण योजना, एसटी बस, पोलीस प्रशासन आदी विषयांवरील प्रश्नांबाबत आमदार संजय जगताप यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. याप्रसंगी महाविकास आघाडीचे प्रवक्ते नंदुकाका जगताप उपस्थित होते.

यावेळी आमदार संजय जगताप यांनी, २००४ रोजी सुरू झालेली पुरंदर उपसा योजना २०१९ पर्यंत व्यवस्थीत राबविता आली नाही. त्याकाळात त्या भागातील उसाचे उत्पादन केवळ ५ हजार टन होते. २०१९ नंतर आम्ही योजनेचे योग्य नियोजन केल्याने टप्प्या टप्प्याने यात वाढ होऊन यंदा ७ लाख २५ हजार टन उस उत्पादन वाढले आहे. फळबागा, फूलशेती एकूणच बागायत क्षेत्र वाढले असून आता मिळालेल्या निधीचे आणि पुरंदर उपसा बरोबर जनाईचेही योग्य नियोजन करून हा पठारी भाग पुर्णपणे बागायत होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आपत्ती व्यवस्थापनाचा निधी सुशोभिकरणाकडे

दि २५ सप्टेंबर २०१९ रोजी पुरंदर किल्ला व सासवड परिसरात झालेल्या ढगफूटीमुळे क-हा नदीला महापूर आला होता. त्यावेळी नदीकाठच्या शेती, रस्ते, स्मशानभूमी, दशक्रिया विधी घाट याबरोबरच नदीवरील लहान मोठे बंधारे वाहून गेले होते. याबाबत शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळाली मात्र रस्ते, स्मशानभूमी, दशक्रिया विधी घाट याबरोबरच नदीवरील लहान मोठे बंधारे, संरक्षक भिंती यासाठी २०१९ मध्येच प्रस्ताव केले होते. मात्र केवळ निधी वळविण्यासाठी सदर प्रस्ताव शासनाकडून गहाळ करून पुणे जिल्ह्यासाठीचा हा सर्व निधी बारामती शहर परीसरातून गेलेल्या नदीपात्राच्या सुशोभिकरणासाठी वापरल्याचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले.

भिक नको काम द्या….
लाडकी बहिण आणि लाडका भाऊ या योजनांना विरोध नाही मात्र शासनाला खरोखरच त्यांना मदत करायची असेल तर शासनाच्या विविध विभागातील रिकाम्या असणाऱ्या लाखो जागांवर नोकरी देऊन त्यांना कार्यक्षम करणे आवश्यक आहे. त्यांना भिक नको काम द्या अशी मागणीही याप्रसंगी आमदार संजय जगताप यांनी केली.

पुणे जिल्ह्य़ात महाविकास आघाडीचा जोर राहणार
आगामी विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्हा तसेच पुणे शहरात २१ पैकी १७ ते १८ जागा महाविकास आघाडीला मिळतील असे सांगत आमदार संजय जगताप यांनी, महाविकास आघाडीचे नेते खासदार शरदचंद्र पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश मिळणार आहे.

जिल्हयात पुरंदर आणि भोर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेतच. मात्र खेड, जुन्नर आणि मावळ याठिकाणीही काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहेत., या भागातील ग्रामपंचायती, विकास सोसायट्या, साखर कारखाने काँग्रेसच्या विचाराचे असून त्याठिकाणी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने मी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे उमेदवारी मागणार असल्याचेही आ संजय जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांच्याकडे आहे. याबरोबरच शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड याठिकाणी गत निवडणूकीत काँग्रेसचा निसटता पराभव झाला होता. याही जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील., एकूणच पुणे जिल्हयातून काँग्रेसला ८ ठिकाणी उमेदवारी मिळे असेही आमदार संजय जगताप यांनी सांगितले.

Leave a Comment