देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकाऱणातले खलनायक आणि कळीचा नारद आहेत अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केली.
तसंच अनिल देशमुखांना केलेले आरोप योग्यच आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी भाजपावरही जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत? महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जो खुलासा केला आहे की ते गृहमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे एक मध्यस्थ पाठवला आणि त्या मध्यस्थाने सांगितलं की तुम्ही तीन प्रतिज्ञापत्रांवर सह्या करा, तसं केल्यास तुम्ही तुरुंगात जाणार नाही तुम्हाला अटक होणार नाही किंवा ईडी सीबीआयची कारवाईही होणार नाही.
समित कदम हा सद्गृहस्थ देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने अनिल देशमुख यांना वारंवार भेटला होता. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब यांच्यावर सांगतोय ते आरोप करा, प्रतिज्ञापत्रांवर सह्या करा असं सांगत होता. अशा धमक्या त्यांना देण्यात आल्या. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातले खलनायक आहेत हे माझं स्पष्ट मत आहेत. यांनी हे वक्तव्य केलं आहे.
मी, अनिल देशमुख राजकीय दबावाला बळी पडलो नाही-राऊत
राजकीय दबावाला मी, अनिल देशमुख असे लोक बळी पडले नाहीत. जे झुकले ते भाजपात गेले. मग ते अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील. अजित पवार, एकनाथ शिंदे वेश पालटून फिरत होते. अनिल देशमुख यांना समित कदम भेटले होते. आता यावर फडणवीस आणि त्यांची टोळी सांगेल की आमचा काही संबंध नाही.
मात्र हा त्यांचा संबंध आहे असं संजय राऊत म्हणाले आणि त्यांनी समित कदम यांचे देवेंद्र फडणवीसांबरोबरचे त्यांचे फोटोही दाखवले. तसंच समित कदम हा संघाशी संबंधित आहे असंही संजय राऊत म्हणाले आहेत. आम्ही त्या समित कदमला ओळखत नाही, अनिल देशमुख सांगतात ते खोटं आहे असा दावा केला जाईल त्यासाठी आम्ही अनेक पुरावे देऊ शकतो.
समित कदम कोण आहे? त्याला वाय दर्जाची सुरक्षा का दिली आहे? या प्रश्नाचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं. अनिल देशमुख यांच्याबाबत जे झालं आहे ते माझ्याबाबतही झालं आहे. मी व्यंकय्या नायडूंनाही या संदर्भात पत्र लिहिलं होतं. त्यात मला धमक्या कशा येत होत्या ते मी सांगितलं.
माझ्याबरोबर जे घडलं तसाच हा प्रकार आहे असं संजय राऊत म्हणाले. आधी समजावलं जातं ऐकलं नाही तर धमक्या दिल्या जातात. अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस वेश पालटून फिरत होते हे करायची गरज काय? असा सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे.
देवेंद्र फडणवीस खलनायक आणि कळीचा नारद
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले खलनायक आहेत. किती लोकांना त्यांनी खास सुरक्षा दिली आहे ते आम्ही तपासत आहोत. देवेंद्र फडणवीस म्हणजे राज्याच्या राजकाणात कळीचा नारद आहेत. महाराष्ट्र कलंकित करण्याचं काम त्यांनी केलं.
महाराष्ट्रात त्यांनी विषाचा प्रवाह निर्माण केला. हे राज्य त्यांना माफ करणार नाही. इतिहासात त्यांची नोंद खलनायक, कळीचा नारद अशीच होईल. या राज्याचं भलं करण्याची संधी त्यांना ईश्वराने दिली होती पण त्यांना राज्य पुढे नेता आलं नाही.
महाराष्ट्राच्या जनतेतील तिरस्करणीय व्यक्ती कुणी असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांनी पदाचा, सत्तेचा, हातातल्या यंत्रणेचा गैरवापर लोकशाही संपवण्यासाठी केला आहे असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.