राज्य सरकारची लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे. या योजनेवरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.
सरकारला लाडक्या बहिणीची इतकीच काळजी असेल तर दारूची दुकाने बंद करा, असे आव्हान सुषमा अंधारे यांनी सरकारला दिले आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
पंधराशे रुपयांची महिलांना गरज का पडते, मालक धडधाकट कमवते, पण येताना पावशेरी मारतो, आकडे खेळतो. त्याच्यातच कमाई सगळी चालली.
लाडक्या बहिणीची जर एवढी काळजी असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी बहिणीच्या कल्याणासाठी दारूचे धंदे बंद करावे. दारूचे धंदे बंद झाले तर मायमावल्या पंधराशे रुपये मागणार नाहीत. महिला सुखी होतील, असं सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, लाडकी बहीण योजना अजित पवारांनी जाहीर केली. ज्या माणसाने एक महिन्यापूर्वी आपल्याच बहिणीच्या विरोधात उमेदवार उभा केला. त्या माणसाने लाडकी बहीण योजनेवर बोलावं, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
तसेच, एवढी बहिणींची काळजी असेल तर बहिणीला पंधराशे नको, दाजीला नोकरी द्या. दाजीच्या मुलांना चांगलं शिक्षण द्या, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.