आमदार रोहित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुती बरोबर जाण्याच्या आधी गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला जाताना मास्क आणि टोपी घालून ते दिल्लीला जात असत, असं त्यांनीच पत्रकारांबरोबरच्या अनौपचारिक गप्पामध्ये सांगितल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.
मात्र, यावरूनच विरोधकांनी अजित पवार यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यासंदर्भात आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही भाष्य करत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.
तसेच लोकांनी लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला टोपी घातली, आता विधानसभेलाही असंच उत्तर लोक महायुतीला देतील, अशी टीका रोहित पवारांनी महायुतीवर केली.
अजित पवार आणि अमित शाह यांच्या भेटीबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, “अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडून महायुतीबरोबर जाण्याचा जो निर्णय घेतला तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय होता. आता ते अमित शाह यांना भेटण्यासाठी जात असताना टोपी घालत होते की मास्क घालत होते, याबाबत आम्हाला तरी सांगता येणार नाही.
पण याबाबत त्यांनीच स्वत: सांगितल्यामुळे आपल्याला माहिती झालं. दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस हे देखील टोपी घालायचे. सध्या महायुतीचं सरकार सामान्य लोकांना फक्त टोपी घालण्याचं काम करत आहे.
मात्र, लोकशाहीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत लोकांनीच महायुतीला टोपी घातली”, अशी खोचक टीका रोहित पवार यांनी केली.
“लोकांचे प्रश्न बाजूला ठेऊन महायुती सरकार काम करत आहे. पण आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जे काही महायुतीचे आमदार असतील त्यांना लोकशाहीच्या माध्यमातून लोक टोपी घालतील. महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजना आणली. त्या योजनेचं आम्हीही स्वागत केलं.
पण त्याची व्याप्ती आणखी वाढवली पाहिजे. मात्र, हे सरकार फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हे काम करत आहे”, असा हल्लाबोल रोहित पवार यांनी केला.
ते पुढे म्हणाले, “महायुतीमधील नेत्यांना राज्यातील सर्वसामान्य लोक लाडके नाहीत, महत्वाचे नाहीत. तर त्यांच्यासाठी फक्त खुर्ची महत्वाची आहे. सत्ताधाऱ्यांनी काही जरी केलं तरी लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने लोकांनी त्यांना उत्तर दिलं तसंच उत्तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही देतील, असा विश्वास आम्हाला आहे”, असं रोहित पवार म्हणाले.