इयत्ता नववीत शिकणाऱ्या (१४ वर्षीय) अल्पवयीन मुलीवर नजर ठेवत थेट तिच्या घरी जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न एका शाळेतील कारकुनाने केला होता.
संबंधित मुलीने या कारकूनास प्रतिकार केल्याने संशयित आरोपीने तिला किटकनाशक औषध पाजून बळजबरी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (दि. २८) इंदापूर तालुक्यात घडला होता.
या अल्पवयीन मुलीवर अकलूज मधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज (बुधवार) पहाटे या मुलीचा मृत्यू झाला. त्यामुळे इंदापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी रणजित जाधव असे अटक केलेल्या संशयीत आरोपीचे नांव असून पोलिसांनी त्याच्या विरोधात जीवे मारण्याच्या प्रयत्नासह बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. आता मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने या संशयित आरोपी विरोधात पोलिसांकडून खूनाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.
पीडित मुलीच्या फिर्यादीनुसार, संशयीत आरोपी रणजित जाधव याने आपल्या घरी येऊन अंगलगट करण्याचा प्रयत्न केला, बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यास आपण प्रतिकार केला, त्यावेळी जाधव याने आपल्याला कीटकनाशक पाजलं अशी फिर्याद देखील पोलिसांनी दाखल केली.
इंदापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत संबंधित मुलीनं स्वतः औषध प्राशन केलं असं म्हटले. मात्र याच मुलीच्या फिर्यादीवरून इंदापूर पोलिसांनी संबंधित सशयित आरोपीने आपल्याला औषध पाजल्याचा गुन्हा यापूर्वीच दाखल केला आहे.
त्यामुळे या सर्व प्रकरणाला पोलिस प्रशासन बगल देत आहे का ?असा प्रश्न उपस्थित होत आहे. इंदापूर तालुक्यातील एका नामांकित शिक्षण संस्थेत हा संशयित आरोपी कारकून असून, त्याच शाळेत नववीत शिकणारी ही विद्यार्थीनी होती.
आरोपीनं मुलीच्या घरी जाऊन हा प्रयत्न केला होता. पीडित मुलीवर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिची प्रकृती चिंताजनक होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.