माजी गृहमंत्र्यांनी विद्यमान गृहमंत्र्यांवर केलेले गंभीर आरोप पाहता महाराष्ट्राची परिस्थिती शरमेने मान खाली घालावी अशी झाली आहे. महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेवर न बोललेलेच बरे असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.
कराड येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी इंद्रजीत चव्हाण, अल्पसंख्याक सेलचे झाकीर पठाण, कराड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, कराड शहर काँग्रेसचे अध्यक्ष ऋतुराज मोरे यांची उपस्थिती होती.
राज्यातल्या राजकारणावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, घोडेबाजार करणाऱ्या लोकांना, विश्वासघात करणाऱ्या लोकप्रतिनिधींना शिक्षा करायची का बक्षीस द्यायचे हे आता लोकांनाच ठरवावे लागेल.
महाराष्ट्रातील सत्तांतर हे फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने झाले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी हा देश कुठे आणून ठेवला आहे? असा सवालही त्यांनी यावेळी केला.काँग्रेसच्या बैठकीत सूत्र ठरणार!आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस किती जागा लढणार? याबाबत छेडले असता पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाविकास आघाडीचे विधानसभेच्या जागांचे सूत्र ठरलेले आहे.
किती जागा लढणार हे मी स्पष्ट सांगणार नाही मात्र तिन्ही पक्ष एकत्रित बसून यावर चर्चा करून निर्णय होईल हे मात्र नक्की.
राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न गंभीरउपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी वेशांतर करून मुंबई ते दिल्ली प्रवास करणे म्हणजेच देशातील विमानसेवा किती ढिसाळ आहे हे समोर येते. यातून राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याचे मतही चव्हाण यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.